
भाजपाने शहरातील २५ नररत्नांना दिला कमळ सन्मान
रत्नागिरी, ता. २७ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काल (ता. २६) शहर भाजपाने २५ नागरिक बंधू-भगिनींचा ‘कमळ सन्मान’ देऊन सन्मान केला. समाजामध्ये राष्ट्रहीत, समाजहीत यांना प्राधान्य देऊन कार्यरत असणारे तसेच क्रीडा, शैक्षणिक प्रकारात नैपुण्य मिळवलेल्या रत्नागिरीतील नररत्नांना सन्मानीत केले. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व जिल्हा, शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींच्या घरी जाऊन हा सन्मान केला.
यामध्ये सान्वी मांडवकर (रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीरसौष्ठव स्पर्धा राज्यस्तरीय निवड), श्रावणी डाफळे (खो-खो राज्यस्तरीय खेळाडू), साक्षी डाफळे (खो-खो राज्यस्तरीय खेळाडू), पार्थ जाधव (नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड), हेमंत जाधव (जाधव फिटनेसतर्फे महिलांची पहिली शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजन), मिनार कुर्टे (व्हॉलीबॉल स्पर्धा मुंबई विद्यापीठात निवड), ओम शिर्के (बुडो मार्शल आर्टस स्पर्धेत यश), सरदार शेख (उत्कृष्ट समालोचक) , शकुंतला लोंढे, श्रावणी उकिडवे (शिष्यवृत्ती परीक्षा), सौरभ फडके (राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट), सायली कर्लेकर (खो-खो) आदी २० जणांचा सन्मान शहर भाजपाने केला.
या वेळी जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजेंद्र पटवर्धन, नगरसेवक राजू तोडणकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, पल्लवी पाटील, राजेंद्र फाळके, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी अॅड. पटवर्धन म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये एकूण ७५ नररत्नांना सन्मानित करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा संचालित केंद्रशासनाने ३७० कलम रद्द केले. आयोजनामध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारणीचे कार्य सुरू करतानाच काशिविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. हिंदुस्थानाच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी ही मौल्यवान भेट म्हणावी लागेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरीकांपर्यंत पोहोचत अमृत महोत्सवी वर्षामध्ये नवचैतन्य जागवावे. राष्ट्रभावना जागृत करावी, त्याच बरोबर समाजातील सकारात्मकता, नैपुण्य या गुणांचा गुणांचा सन्मान करावा. या हेतूने कमळ सन्मान पुरस्कार भाजपाने प्रदान केला आहे.
