
भरती परीक्षेत फसवणूक करणार्यांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाच्या परीक्षेसाठी येऊन बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक करू पाहणार्या तिघांविरोधात बुधवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सन्नी पालराम (वय 28, रा. अलिपूर जिंद हरियाणा), सोनू शिशुपाल (वय 22, रा. भुंडगा कॅथल, हरियाणा), सन्नी सुभाष भोसला (वय 23, रा. जिंद हरियाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तटरक्षक दलाचे प्रधान नाविक विमल रामकुमार जांगीड (सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवार 22 जून रोजी सकाळी 8.30 वा. भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाची परीक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी कार्यालयाच्या मेनगेटवर या तिघांची तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनिक डीवाईस ब्लूटूथ, बनावट कागदपत्रे होती. त्याद्वारे ते शासनाची फसवणूक करत होते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करत आहेत.