
दापोलीतील आठ नगरसेवकांसह सुमारे दीडशे नागरिकांवर गुन्हा
निवडणूक निकालावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना नियमावलीचे उल्लंघन
दापोली : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या वेळेस जमाव करून जल्लोष, घोषणाबाजी व मिरवणूक काढल्यामुळे नवनिर्वाचित आठ नगरसेवकांसह सुमारे दीडशे नागरिकांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाबतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्याकडील आपती व्यवस्थापन कायद्याअन्वये पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्रौ. 11 वाजेपर्यंत बंदी आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19 जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल सीआरपीसी 149 प्रमाणे नियमांचे उल्लंघन करू नये. याकरिता दापोली पोलीस ठाणेमार्फत दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीतील उभे राहिलेल्या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली होती. तरीही दिनांक 19/01/2022 रोजी दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल लागत असताना सुमारे 10.00 वा.च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकालाची प्रक्रिया सुरू करून विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यास सुरूवात केली असता सुमारे 10 ते 12 वा. च्या दरम्यान दापोलीलीत राहणारे खालीद अब्दुल्ला रखांगे, मेमन अरिफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रवींद्र गंगाराम क्षीरसागर, अजिम महमद चिपळुणकर व इतर उमेदवार यांनी सुमारे 100 ते 150 कार्यकर्ते (सर्व रा.दापोली) असे लोक जमून निवडणूक विजयाचा जल्लोष करू लागले, व घोषणाबाजी करु लागले. नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्त अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत समजावण्यात आले. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेमण्यात आलेल्या बंदोबस्त अंमलदार यांच्यामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ शुटींग केले. जमाव करून दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयाचा उत्सव साजरा केला. घोषणाबाजी करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्या या कृत्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्चा संभव आहे, हे माहीत असून देखील सामाजिक अंतर न ठेवता विनामास्क राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केले. पोलीस कर्मचारी सुहास पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व संशयितांविरुद्ध भा.दं.वि.क 269,270,34, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(1) (ब), नुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.