राजापुरात बारशाला जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात अपघातात 15 जखमी, 8 गंभीर
राजापूर : तालुक्यातील जुवाठी येथून वारगाव येथे बारशासाठी जाणाऱ्या छोट्या टेम्पोला मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे येथे गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील आठ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली व कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान अपघात घडला .
या अपघात झालेल्या जखमींमध्ये मयुरी सूर्यकांत पुजारे (वय 17), रूक्मीणी पोवार (वय 55), आकाश नारायण मांडवे (वय 12), गौरी जनार्दन पुजारे (वय 5), उत्कर्षा रंगनाथ पाटील (वय 4) पारस सुर्यकांत पुजारे (वय 10), विद्या रंगराव पाटील (वय 40), आर्यन रंगराव पाटील (वय 11) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी अधिक उपचारासाठी कणकवली तसेच कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर मयुरी सूर्यकांत पुजारे (वय 17), अंजनी मधुकर पुजारे (वय 50), सुमित्रा खेमाजी कुडाळकर (वय 65), सुवर्णा सहदेव पुजारे (वय 50), सुहासिनी शिवाजी पुजारे (वय 45), तन्वी वसंत मांडवे (वय 40), मानसी सुर्यकांत पुजारे (वय 45), सुनिता सुरेश पुजारे (वय 55) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी जुवाठी येथील हे सर्व ग्रामस्थ मुला-बाळांसह वारगाव येथे एका बारशाच्या कार्यक्रमासाठी छोटा हत्ती या लहान टेम्पोतून जात होते. 11.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे गावी हा टेम्पो आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
एका मुलाचा हात गाडीखाली सापडला होता. पलटी झालेला टेम्पो उचलून मुलाचा हात बाहेर काढला. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.