दीड लाखांच्या दागिन्यांसाठी दापोलीतील तीन महिलांचा खून?; पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे
दापोली : तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण दापोली तालुका हादरून गेला. वणोशी खोतवाडी येथे ऐन संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली असून पैसे व दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने या महिलांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दापोली पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा नोंदवला असून तीन महिलांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे नमूद केले आहे.
या महिला ज्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आल्या त्या घराचा पुढील दरवाजा बंद होता व मागील दरवाजा उघडा होता. सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्याजवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त देखील वाहून गेल्याचे दिसून येत होते. शिवाय पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसर्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणार्या त्यांच्या दुसर्या नातेवाईक होत्या. त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता. या बाबी विचारात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्याकडील दागिने चोरल्यानंतर डोक्यात फटका मारून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद हे करत आहेत.