बांगडा, म्हाकुळसाठी परप्रांतीय नौका रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत
परप्रांतीय नौकांच्या झुंडीच्या झुंडी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी भागाकडे वळल्या आहेत. मंगळवारी सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीपासून सतरा वावामध्ये तीस ते चाळीसहून अधिक नौका मासेमारी करत होत्या. त्या परप्रांतीय नौका असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले होते. वेगवान इंजीन असल्यामुळे स्थानिक जुन्या नौका त्यांच्यापुढे टिकाव धरत नाहीत. रत्नागिरीच्या हद्दीत सध्या बांगडा, म्हाकुळ सारखा मासा मुबलक मिळत आहे. तो मारण्यासाठी ते मच्छीमार येतात. अशा प्रकार नियमित मासेमारी झाली तर स्थानिक मच्छीमारांना मासाच मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.
परप्रांतीय मलपी नौकांचा धुडगुस सुरुच आहे. जिल्ह्याच्या हद्दीतील जयगड, दाभोळ किनार्यांवरही त्यांचा वावर वाढला आहे. बांगडा, म्हाकुळ मासा मारण्यासाठी झुंडीने या मलपी नौका किनार्यावर येत असल्याचे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे असून याकडे मत्स्य विभागाकडून कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे. दाभोळ येथील मच्छीमारांनी परजिल्ह्यातून येणार्या फास्टर नौकांविरोधात कारवाईसाठी आंदोलन पुकारलेले आहे. दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाकडून एका कर्नाटकमधील नौकेवर कारवाई करण्यात आली असून ती नौका जप्त केली आहे. त्यांच्यावर पाच पट दंडाची कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. मत्स्य विभागाकडे गस्तीसाठी एकच नौका असल्यामुळे परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.
www.konkantoday.com