कोमसाप केंद्रीय अध्यक्षपदी नमिता कीर यांची निवड


रत्नागिरी/प्रतिनिधी-कोमसापच्या अध्यक्षपदावर ‘दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस’च्या मालक, प्रकाशक तथा सहसंपादक सौ.नमिता कीर यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. मालगुंड कवी केशवसुत स्मारक येथे रविवारी झालेल्या  28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निवडीनंतर सौ.नमिता कीर यांच्यावर साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोमसापची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मालगुंड येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सल्लागार- श्री.अरूण नेरूरकर, विश्वस्त मंडळ अध्यक्ष-रमेश कीर, विश्वस्त- रेखा नार्वेकर, प्रकाश दळवी (कोषाध्यक्ष), नियामक मंडळ अध्यक्ष -डॉ.भालचंद्र मुणगेकर, नियामक सदस्य मा.ना.उदय सामंत, आ.संजय केळकर, ज्योती ठाकरे, शोभाताई सावंत, प्रा.अशोक ठाकूर, उषा परब, परिषद अध्यक्ष सौ.नमिता कीर, परिषदेचे कार्याध्यक्ष-प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, परिषदेचे कार्यवाह- प्रा.माधव अंकलगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष-श्री.मंगेश म्हस्के, डॉ.शशांक पाटील, सुधीर सेठ, मोहन भोईर, प्रवीण दवणे, लता गुठे, प्रशांत डिंगणकर, कवी केशवसुत स्मारक समिती अध्यक्ष गजानन पाटील, प्रा.अशोक ठाकूर, अनुराधा नेरूरकर, गौरी कुलकर्णी, उषा परब, दीपा ठाणेकर, एल.बी.पाटील, अ‍ॅड.यशवंत कदम, रवींद्र आवटी आदी मान्यवरांसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर, वाचक, पत्रकार उपस्थित होते.
सौ. नमिता रमेश कीर यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असे आहे. मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ नमिता कीर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे मध्यवर्ती संमेलने, महिला संमेलने, युवा-बालसाहित्य चळवळीची उभारणी, कोकण प्रांतातील एकूण नऊ जिल्ह्यात साहित्य चळवळीचा विस्तार व वाढ करणे यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
 तसेच सौै. कीर यांनी कोमसापच्या ‘झपूर्झा’ या वाङ्मयीन त्रैमासिकाच्या संपादक म्हणून अनेक वर्षे उत्तमरित्या कार्यरत आहेत. कविता संग्रह, गझलगाथा, निवडक झपूर्झा या पुस्तकांचे लेखन-संपादन, वृत्तपत्र, दिवाळी अंक, मासिके यातून सातत्याने लिखाण, दूरदर्शनवरील अनेक परिसंवाद, चर्चेत सहभाग अशा त्यांच्या विविधांगी कार्याचा या नियुक्तीमुळे यथोचित गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहेत. कोेमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मागदर्शनाखाली नमिता कीर यांनी मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button