जनाधार नसलेल्या पोरखेळातील राजकीय कुरघोड्याच्या खेळीने हा योगेश कदम कधीच खचून जाणार नाही-आमदार योगेश कदम
माझ्या कामावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मी आमदार आहे. जनाधार नसलेल्या पोरखेळातील राजकीय कुरघोड्याच्या खेळीने कधीच खचून जाणार नाही असे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी म्हटले आहे
शिवसैनिकांच्या पुढे आपले काहीही चालत नाही. म्हणून बिथरलेल्या समदुःखींनी एकत्र येत, सेना नेतृत्वाकडे खोट्या तक्रारी करून दापोली- मंडणगड नगरपंचायत निवडणुकीपासून दूर ठेवले. येथील सूत्रे माझ्याकडे दिलेली नाहीत.असे असले तरी मी जनतेच्या दरबारात न्याय मागणारा कार्यकर्ता आहे. या बाबतीत निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.
दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसेनेकडून अपक्ष अर्जही दाखल करण्यात आल्याने येथील निवडणूक रंगतदार होणार आहे. आमदार योगेश कदम म्हणाले, मी कालही शिवसेना जनमानसात रुजवण्याचे काम करत होतो, आजही तेच काम करत आहे आणि उद्याही संघटनावाढीचे काम करत राहणार आहे. या राजकीय प्रवासात कितीही प्रकारचे अडथळे आले, तरीही त्यावर मात करून संघटना वाढीसाठी कार्यरत राहणार आहे.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात शिवसेनेच्या झालेल्या पराभवानंतर या मतदारसंघात पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम सुरू केले. या कामाची जाण जनतेने ठेवली.
www.konkantoday.com