रत्नागिरी नगर परिषदेच्या विरोधात योगेश हळदवणेकर यांचे १० पासून बेमुदत उपोषण
रत्नागिरी नगर परिषदेच्या गॅसलाईन, पाणी योजना आणि रस्ते डांबरीकरण कामात भ्रष्टाचार झाला आहे. या तिन्ही कामाची पंचयादी टाकून काम इस्टीमेटनुसार झाले की नाही, हे सिद्ध करण्याची मागणी नगर परिषदेने मान्य न केल्याने सुजाण नागरिक योगेश हळदवणेकर दि. १० डिसेंबर रोजीपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांत, नगराध्यक्ष, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचे, गॅस योजनेचे काम हे इस्टीमेटनुसार काम झाले नाही, असा आरोप हळदवणेकर यांनी केला आहे. त्याशिवाय रस्ते डांबरीकरण करताना त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत १९ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी नगर परिषद रत्नागिरी यांना त्यांनी निवेदन देऊन या तिन्ही कामांची स्वतः समक्ष पंचयादी घालून तपासणी करावी, ही मागणी केली होती. त्या मागण्या मान्य न करता संदर्भहीन उत्तरे नगर परिषदेने दिली. ती उत्तरे देतानाही विलंब केला. त्यामुळे १० डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय हळदवणेकर यांनी घेतला आहे. त्यानुसार १० डिसेंम्बर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून माळनाका येथील लोकनेते स्व. शामराव पेजे यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com