दिव्यांगांचा सामर्थ्यवान मार्गदर्शक- सादिकभाई नाकाडे
वयाच्या सोळाव्या वर्षी एखादा मुलगा अल्लड, स्वच्छंदी व एक अवखळ आयुष्य जगत असतो.. त्याला ना दिशा असते ना प्रवाहाचा ओघ. ना जीवनाचे गमक ठाऊक ना कर्तव्य अन जबाबदारीची जाणीव. कोणतेच उद्दिष्ट नसलेल्या प्रवाहात तो स्वतःला वाहवत असतो अगदी बेभान वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे.. अशा मृगजळ भासणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागतो. हलकेच फुटणाऱ्या जीवनाच्या आम्रवृक्षाचा मोहोर एका क्षणात गळून पडतो. आणि सारे जीवन खडतर बनते, स्थिर होते एका व्हीलचेअरवर.. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याच्या पाऊलवाटा जागच्या जागी स्थिरावतात आणि बनते एकव्यापी आयुष्य. मात्र या वेदनादायी वादळात त्याने स्वतःची जगण्याची उमेद सोडली नाही. मनात उत्कर्षाची तेजोमय वात अखंड झळकत ठेवली आणि ती वात स्वतःच्या आयुष्यातलाच नव्हे तर इतरांच्या ही आयुष्यातला अंधार दूर करणारी ठरली. स्वतःवर ओढवलेल्या संकटाला दूर सारून त्यातून मार्ग काढून आधी स्वतःला कणखर बनवले. अश्रूंत गुरफटून न राहता हास्याने जग जिंकून घेतले. आपण दिव्यांग असलो तरी आपण एक माणूस आहोत आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर साऱ्या दुनियेला गवसणी घालण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली. आपल्याकडे पाहताना कुणी दुर्लक्षित केलेला बिचारा, दुर्दैवी अपंग अशी विशेषणे लावून न पाहता भल्याभल्याने एक प्रेरणा म्हणून नजर रोखून पाहावे एवढे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. हे सारे करताना बऱ्याचदा अपयश आले आजूबाजूला फसवी, मतलबी माणसे भेटली मात्र त्याचा स्वतःवर परिणाम करून न घेता, न डगमगता दुःखाचा क्षणभर सोहळा साजरा करून त्याने जीवनाचा यशस्वी मनोरा रचला आणि बनला एक यशस्वी संस्थापक, दिव्यांगांचा सामर्थ्यवान मार्गदर्शक अन दिव्यांगांच्या आयुष्यात झळकणारा प्रज्वलित दीपक..
आपण बोलत आहोत आर. एच. पी. फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष श्री. सादिक करीम नाकाडे यांच्याबद्दल.. 1988 मध्ये भयंकर अपघातात त्यांना आयुष्य भराचे अपंगत्व आले. अत्यंत दयनीय परिस्थितीला स्वतःपुढे झुकवून त्यांनी स्वतःच स्वतःला जीवनदान दिले. हॉस्पिटलमध्ये एक वर्ष उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या कंबरेखाली कोणतीच संवेदना नव्हती. आयुष्य व्हीलचेअरवरतीच व्यतीत करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र खचून न जाता त्यांनी स्वतःला सावरले. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहसाठी जनरल स्टोअर्स टाकून यशस्वी उद्योजक झाले. 2013 साली मॅरेथॉनमध्ये भाग घेतला व ती स्पर्धा जिंकली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यामुळे आपल्या सारख्याच इतर दिव्यांगांना व्यावसायिक व आर्थिक पुनर्वसनासाठी आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मदत करता यावी म्हणून श्री. सादिक नाकाडे यांच्या संकल्पनेतून 15 मे 2015 रोजी आर. एच. पी. फाऊंडेशन तथा रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशन, रत्नागिरी ही संस्था स्थापन करण्यात आली. एखाद्याच्या आयुष्यात अचानक झालेल्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात नस दबली जाऊन मणक्याला प्रॉब्लेम होतो व त्यातून पॅराप्लेजिक तसेच कॉड्रिक पेशंट तयार होतात. अशा वेळी त्या व्यक्ती खचून जातात. एका खोल गर्तेत अडकून पडतात. जीवनाच्या सुखमय क्षणांपासून वंचित राहतात, स्वतःला चार भिंतीत बंदिस्त करून घेतात. स्वतःला जगापासून अलिप्त ठेवतात आणि मग जगही त्या व्यक्तींना दुर्लक्षित करू लागते. अशा व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण होऊन त्या स्वतःचे आयुष्य संपवतात. त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालावते व मरेपर्यंत मरणयातना भोगत जगत राहतात. सर्व संपले म्हणून हतबल होतात. कुटुंबही त्यांच्याकडे ओझे म्हणूनच पाहत असते. अशा प्रकारच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे समुपदेशन करणे, मनोबल वाढवून स्वतःच्या जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांना समाजात वावरण्यासाठी सामान्य माणसाप्रमाणे सक्षम बनवणे, त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांना घराची रचना त्या व्यक्तीच्या सोयीनुसार करण्यास मार्गदर्शन करणे, मुंबईतील हाजी अली हॉस्पिटलमध्ये स्वतः घेऊन जाणे व ट्रेनिंग घेण्यास मार्गदर्शन करणे, अबोल न राहता आपले प्रश्न मांडणे तसेच निःसंकोचपणे मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचप्रमाणे गरजेप्रमाणे शासकीय योजना मिळवून देणे आणि त्यातून आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी व्यवसायाचे मार्ग उपलब्ध करून देणे यांसारखे असंख्य उद्देश ठेऊन ही संस्था स्थापन करण्यात आली. मात्र या लोकांना भेट देत असताना इतर अनेक जन्मतः अपंग, मतिमंद, कर्णबधिर, अस्थिव्यंग या लोकांची भेट होत गेली. त्यांच्या व्यथा समजत गेल्या. रत्नागिरीमध्ये अशा लोकांवर काम झालेले नव्हते. त्यामुळे अशा लोकांना एका संस्थारुपी छत्रछायेखाली आणण्यास तळागाळातील गावांना भेट देऊन , जागोजागी शिबिरे भरवुन सभासद नोंदणी करून घेतली. त्यांना त्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
त्या लोकांच्या वेदना, मनातील लुप्त भावना, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष भेटून जाणून घेतल्या. सर स्वतः अपंग असल्याने आणि तेवढ्याच आत्मीयतेने त्यांची व्यथा जाणून घेत असल्याने ते लोक आपला माणूस समजून मोकळे होत गेले त्यामुळे त्या त्या वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे शक्य झाले. मानसिकदृष्ट्या हतबल झालेल्यांवर मायेची पाखरणी केली. यामुळे दिव्यांग खऱ्या अर्थाने बदलत गेला. अनेक लोकांना अपंग प्रमाणपत्र माहीतही नव्हते ते त्यांना मिळवून दिले. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना आवश्यक गोष्टींची पूर्तता करून घेऊन ती त्या त्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष संस्थेकडून सादर केली. एस टी व रेल्वे पास, युनिक आय डी, पेन्शन योजना, ग्रामपंचायत 5% निधी, जि. परिषद 5 % निधी मिळवून दिला. दिव्यांगांना शासकीय ठिकाणी तसेच ठराविक जागी होणाऱ्या अडचणी यांची नोंद घेऊन प्रशासनाकडे त्या त्या वेळी निवेदने सादर केली. यामुळे प्रत्येक दिव्यांग जागरूक झाला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी तत्पर होऊ लागला. समाजात समरस होऊन सामान्य जीवन जगू लागला. आजपर्यंत दिव्यांग म्हणजे स्वतःवर असलेला भार असे जी कुटुंबे समजत होती त्याच दिव्यांगांना कुटुंबाचे आर्थिक भार सांभाळणारे कुटुंबप्रमुख बनवले. आणि हे खरेच कौतुकास्पद आहे. दिव्यांगांच्या मनात जगण्याची नवी आशा पल्लवित करून नव्या उर्मीने तसेच जिद्दीने संकटांना सामोरे जाण्यास तयार केले. आणि त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने तेजाचा दिवा प्रज्वलित केला.
दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करताना सादिक नाकाडे यांच्यातही खूप बदल झाले. घराबाहेर जाताना प्रवासासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे 2017 साली त्यांचे भाऊ सुलतान नाकाडे यांनी अपंगांसाठीची साईडव्हील लावलेली टू व्हीलर चालवायला शिकवली. ही गोष्ट त्यांच्यासाठी अशक्यप्राय असतानाही त्यांनी ती शक्य करून दाखवली. आरटीओ च्या दोन परीक्षा देऊन त्यात पास झाले आणि लायसन्स मिळवले. त्यामुळे ते एकटेच गाडीवरून कितीही लांबचा प्रवास करू शकतात. गाडी शिकल्यामुळे संस्थेची कामे पटापट होऊ लागली. वेळेत निश्चित स्थळी पोहोचता येऊ लागले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. स्वैरपणे गाडी चालवीत जीवनाचा खरा आनंद त्यांना घेता आला. त्यांनी आजवर 25 हजार किमीचा प्रवास पार केला आहे. त्यामुळे ते इतर दिव्यांग बांधवांनाही याचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास भर देत आहेत. रत्नागिरी मध्ये दिव्यांग म्हणून फोर व्हिलर चालविण्यास ही त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि मग इतर दिव्यांगांना प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक दिव्यांग टू व्हिलर तसेच फोर व्हिलर चे प्रशिक्षण घेऊन स्वतः प्रवास करत आहेत. आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात अडथळे दूर झाले आहेत.
दिव्यांगांचे लग्न म्हणजे दुर्मिळ गोष्ट. व्यंगत्वामुळे मनासारखा जोडीदार लाभत नाही आणि समाजात वावरताना साऱ्यांचा दृष्टीकोन दिव्यांगांच्या विवाहाबाबतीत खूपच वेगळा असतो. मात्र ही बाब खोडून काढण्यासाठी तसेच दिव्यांग बांधवांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा या कल्पनेतून श्री. सादिक नाकाडे यांनी 16 ऑगस्ट 2019 रोजी डॉ. सुनीता पवार यांच्याशी विवाह केला. समाजातील त्या विचारांना तिलांजली देत, मनात कसला ही संकोच न बाळगता विवाहास पुढाकार घेण्यासाठी संस्थामार्फत ते प्रयत्न करू लागले. त्यामुळे दिव्यांगांच्या विचारांत अमूलाग्र बदल झाला आहे. आजवर कित्येक विवाह या संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत. आणि ते भावी जोडीदारासोबत समाधानी आहेत.
रत्नागिरीपासून 22 किमी वरती श्री. सादिक नाकाडे यांचे मूळ गाव नेवरे. याठिकाणी त्यांच्या कल्पनेतून स्वतःच्या मालकीच्या 20 गुंठ्याच्या जागेत एक फार्म हाऊस उभारले आहे. तिथे असंख्य झाडांची लागवड केली आहे. गांडूळखत निर्मिती केली आहे. संपूर्ण फार्म हाऊस च्या जागेत अपंग व्यक्ती सहज व्हीलचेअर वर बसून फिरू शकते अशी रचना केली आहे. प्रत्येक दिव्यांगाने तिथे भेट दिली पाहिजे. त्या वातावरणात स्वतःला समरस करून साऱ्या वेदना विसरून शांत व प्रसन्न वातावरणात एक नवी अनुभूती मिळेल व मनात जगण्याची उमेद निर्माण होईल. प्रत्येक व्यक्तीने या फार्म हाऊस ला भेट देण्याची गरज आहे. एक दिव्यांग स्वतःचे विश्व कसे निर्माण करू शकतो व त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो याचे उत्तम उदाहरण अपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यामधून श्री. सादिक नाकाडे यांना दिव्यांगांना या जगात कोणतीच गोष्ट असाध्य नाही हे दर्शवून द्यायचे आहे तसेच फक्त तोंडाने सांगण्यापेक्षा आपल्या कृतीतून त्यांनी प्रेरणा दिली आहे. अशा प्रकारे दिव्यांगांच्या मनामधील नकारात्मक दृष्टीकोन बदलण्याचे मोलाचे कार्य ते करीत आहे.
कोरोना काळात दिव्यांगांची खुपच गैरसोय झाली. कोणाचे व्यवसाय ठप्प झाले. अंथरुणाला खिळून असणाऱ्या दिव्यांगांना मेडिसिन, डायपर मिळत नव्हते. अशा वेळी त्या त्या दिव्यांग सभासदांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मेडिकल किट पुरवले. यामुळे दिव्यांगांना एक आधार मिळाला. ज्या दिव्यांगांना कोरोना झाला आहे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले तसेच गोंधळून गेलेल्या कुटुंबातील व्यक्तींना कुठे जायचे, काय करायचे याचे मार्गदर्शन केले. तसेच यासाठी इतर सर्व बांधवांना आवाहनही केले. आणि आलेल्या कॉलला समाधानपूर्वक मार्गदर्शन केले त्यामुळे कोरोनासारख्या आजाराला घाबरून गेलेल्या व्यक्तीला दिलासा मिळाला.
जुलै 2021 च्या मुसळधार पावसात चिपळूण बाजारपेठ तसेच आजूबाजूच्या गावात पाणी भरले. अशावेळी सादिक नाकाडे यांनी स्वतः कॉल करून कोणाकोणाचे नुकसान झाले आहे याची चौकशी केली. त्यावेळी संस्थेच्या अनेक दिव्यांग सदस्यांचे व्यवसाय तसेच घरे वाहून गेल्याचे कळले. त्यांना आपल्या प्रेमळ शब्दांनी धीर दिला व कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याची नोंद घेऊन कळविण्यास सांगितले. पूरग्रस्त दिव्यांगांना मदतकार्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे साऱ्या बांधवांना आवाहन केले. त्या अवाहनाच्या माध्यमातून अनेक दानशूर लोक पुढे आले. त्यातून व्यवसायासाठी लागणारे सामान, कपडे, धान्य, पाणी व पैशांची मदत स्वतः जाऊन पोहोचवली. आणि त्यांना भावी जीवनासाठी पुन्हा जिद्दीने उभे राहण्यास पाठिंबा दिला. इतर असंख्य लोकांनी सढळ हस्ते पूरग्रस्तांना मदत केली मात्र ती मदत त्यांना आयुष्यभर पुरणारी नव्हती ती तात्पुरत्या स्वरूपात होती. प्रत्येकाच्या मनात भविष्याची चिंता सतावत होती अशा वेळी आर.एच.पी. फाऊंडेशन या संस्थेचा मूळ उद्देश दिव्यांगांचे पुनर्वसन करणे, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत न करता त्यातून तो भावी जीवन सुधारून यशस्वी होईल याची जाणीव ठेवून मदत करण्यावर भर दिला आणि यातून खूप सारे दिव्यांग पुन्हा व्यवसाय उभारू शकले. यामुळे पुरात स्वप्ने वाहून गेलेला दिव्यांग कणखर बनला. नव्या उमेदीने उभा राहिला..
आजवर तीन हजार वरती असलेल्या सभासदांचा गोतावळा तयार करून श्री. सादिक नाकाडे ही संस्था यशस्वीपणे चालवीत आहेत. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या प्रेरणेने काही लोकांनी स्वतःच्या संस्थाही स्थापन केल्या आहेत. अनेक सभासद स्वतःचे व्यवसाय करत आहेत तर चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत.
या आधी संस्थेच्या कार्याची दखल घेत 2018 साली रत्नागिरी जिल्हा परिषद ने संस्थेला अपंगसेवा गौरव पुरस्काराने गौरविले. 2018 साली अपंगांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी संस्थेने अपंगांना मतदानासाठी उद्युक्त करण्याची मोठी कामगिरी केली. त्याची दखल घेऊन तेव्हाचे जिल्हाधिकारी मा. श्री. सुनील चव्हाण सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच संकल्प कलामंच आणि नेहरू युवामंच रत्नागिरी यांनी सादिक नाकाडे त्यांचा वैयक्तिक सत्कार केला आहे.
✍ मानसी सावंत