
आपलं घरचे संस्थापक, विजय फळणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे रविवारी वितरण सोहळा
रत्नागिरी, ता. २५ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी (ता. २८) सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास डोणजे, पुणे येथील आपलं घर या संस्थेचे संस्थापक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर यांच्यासह अ. भा. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विजय आंबर्डेकर, सचिव गणेश गुर्जर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
गतवर्षीचे पुरस्कार कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे देता आले नव्हते. त्यामुळे ते आता वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार, कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच आदर्श पौरोहित्य पुरस्कार सुयोग मोहन पाध्ये, उद्योजक पुरस्कार विनायक केशव वाकणकर आणि राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार चिपळुणच्या स्वराली उदय तांबे हिला देण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. श्रीधर ठाकुर, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, गणित अध्यापन, शोधनिबंध सादरीकरणाबद्दल डॉ. राजीव सप्रे, नॅनो टेक्नॉलॉजी संबंधित पेटंट मिळवल्याबद्दल डॉ. अभयराज जोशी आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापक कमिटीवर निवड झाल्याबद्दल पद्मश्री आठल्ये यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.
पुरस्कारमूर्तींची माहिती
खानू-मठ येथील निवृत्त सैनिक आणि मुक्त पत्रकार अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार जाहीर झाला. ७२ वर्षीय आठल्ये यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. नंतर इराणच्या शिपिंग कंपनीत इलेक्ट्रिकल ऑफिसर, खानू गावचे पाच वर्षे सरपंचपदही भूषवले. अनेक वर्षे ते मुक्त पत्रकार म्हणून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करत आहेत.
कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार देण्यात येईल. त्यांना भजनी कलाकार असलेल्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला. संगीत विशारद (हार्मोनियम वादन), संगीत अलंकार असलेले कर्वे हे रसायनी येथे एचओसी स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत भूमिका व संगीत संयोजन केले. पनवेल कल्चरल सेंटरचे ते माजी अध्यक्ष आहेत. 1984 पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांनी कीर्तने केली आहेत. त्यांना उज्जैन येथे कीर्तनरत्न ही उपाधी प्राप्त झाली. तसेच नागनाथ जोशी चर्होलीकर स्मृती पुरस्कार व कीर्तन भूषण पदवी, शृंगेरीपीठाधिश प. पू. विधुशेखर भारती तीर्थस्वामी महाराजांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार, हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे कीर्तनभास्कर पदवी प्राप्त झाली आहे.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार सुयोग मोहन पाध्ये यांना जाहीर झाला. न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथून दहावी उत्तीर्ण झाल्यावर पाध्ये यांनी राजापूर संस्कृत पाठशाळा, वेदमूर्ती गणेश खेर, गणेश फाटक, गजानन फाटक यांच्याकडे विविध प्रकारचे याज्ञिक अध्ययन केले. तसेच वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी, प्रकाश साधले, सुनील भाटवडेकर, अनंत बांधेकर, हरिहर खांडेश्वर, बाळकृष्ण थिटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. विविध हस्तलिखित व जुन्या ग्रंथांचे संकलन व प्रकाशन संग्रह भाग 1-2 करून प्रत्येकी 5 हजार प्रतींचे वितरण केले. विशेष यज्ञांचे प्रतिनिधीत्व केले. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या अधिपत्याखाली शृंगेरी पीठामार्फत 8 अतिरुद्रात प्रतिनिधीत्व, नवकुंडात्मक नवग्रयज्ञ केले.
उद्योजक पुरस्कार विनायक केशव वाकणकर यांना दिला जाणार आहे. बीए, आयटीआय (मोटर मॅकनिक) झाल्यावर दहा वर्षे रत्नागिरी एसटी विभागात मेकॅनिक म्हणून नोकरी केली. 1990 पासून अमृत कोकमच्या व्यवसायाला सुरवात केली. उत्पादन परवाना काढून विक्रीला सुरवात केली. एसटी वर्कशॉपमधील कामगार हेच सुरवातीला ग्राहक होते. त्यांनी प्रोत्साहन दिले आणि व्यवसाय वाढवला. 2003 पासून सरबतं, आलं-लिंबू मिश्रीत नवीन रत्नागिरीत प्रथमच बाजारात आणले. ते लोकांना आवडले, काही सुधारणा केल्या व 4 वर्षांत सरबत लोकप्रिय झाले. त्यानंतर अननस, संत्री, कैरी पन्हे, लिंबू सरबतं सुरू केली. पत्नी सौ. ममता हिने लिंबू, आंबा, मिरची लोणचे, मोरावळा करायला सुरवात केली. दोघांनीही फळप्रक्रिया प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आमरस पॅकिंग सुरू केले. गेली चार वर्षे चकली, चकली स्टीक, कडबोळी उत्पादन सुरू केले. त्यांचे दोन्ही मुलगेही या व्यवसायात मदत करतात.
राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार जाहीर झालेल्या स्वरालीने लहानपणापासून योगासन स्पर्धांमध्ये सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या स्वरालीने पाग व्यायामशाळेत प्रशिक्षण रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा सराव सुरू केला. मुंबई महापौर चषक, जिल्हास्तरीय फेडरेशन स्पर्धा, मोर्शी अमरावती येथील स्पर्धा, खेड, शिर्डी, पतियाळा, पंजाब, कणेरी मठ, कोल्हापूर यासह डेरवण येथील युथ गेम, पतंजली आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन योगासन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय फळणीकर हे महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. पुण्यातील वारजे ते अनाथ विद्यार्थीगृह चालवतात. मुलाच्या निधनानंतर त्यांनी या धक्क्यातून सावरण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून आश्रम सुरू केला. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलामुलींना जात, पात, धर्म वगैरेचा भेदभाव न करता सामावून घेतले आहे. त्यांना शिक्षणाबरोबरच राहाणे, जेवण, कपडे, औषधोपचार वगैरे सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात. या संस्थेत मुलामुलींसाठी तांत्रिक शिक्षणाचीदेखील सोय केली आहे, जेणेकरून ती पुढे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील. फाईल बनवणे, शिवण काम, पेपर बॅग बनवणे, संगणक प्रशिक्षण, मुद्रण प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण इथे दिले जाते. पुण्यातील आयटी क्षेत्रातील काही तरुण तरुणी येथे येऊन संगणक प्रशिक्षण देतात आणि संस्थेच्या कामात आपलेही योगदान देतात. श्री. फळणीकर यांचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.
www.konkantoday.com