
सुनेचा खून करणाऱ्या सासूला जन्मठेपेची शिक्षा
चिपळूण : सासू, सुनेमध्ये सातत्याने चाललेल्या वादातून सासूने सुनेला भोसकून मारले. अखेर या प्रकरणी चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सासूला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रेणुका नामदेव करकाळे (55) असे या प्रकरणी शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. वालोपे देऊळवाडी येथे दि. 29 एप्रिल 2017 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. पाच वर्षे चाललेल्या खटल्यानंतर अखेर चिपळूण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी आरोपी महिलेस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत परी प्रशांत करकाळे (45) या विवाहितेचा सासूने आपल्या राहत्या घरीच सुरीने सपासप वार करून व अंगात भोसकून खून केला होता. तब्बल पाच वर्षे येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती. सासू रेणुका व सून परी यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत होते. दररोज सासू-सुनेमध्ये भांडण होत होते. अखेर एक दिवशी सासूने सुनेचा काटा काढला. पती प्रशांत हे कामानिमित्त बाहेर पडले असताना सून परी आंघोळ करून बाथरूमबाहेर पडताच घरातील धारदार सुरीने नराधम सासूने तिच्या पोटात व अंगावर लागोपाठ 36 वार केले आणि सून रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
तीन वर्षांचा मुलगा ओम याने हा प्रकार पाहिला. त्यानंतर शेजारी राहाणार्या स्मिता मयेकर यांना जाऊन सांगितले. स्मिता मयेकर या घटनास्थळी धावत आल्या व त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यामुळे या खटल्यामध्ये त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्या या घटनेच्या प्रमुख साक्षीदार झाल्या व त्यांनी आरोपीच्या विरोधात साक्ष दिल्याने नराधम सासूला शिक्षा झाली. या प्रकरणी पोलिसपाटील बाळकृष्ण भिकू मयेकर, अजय कदम यांच्यासह पंधरा लोकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
न्यायालयाने आरोपी रेणुका करकाळे यांना जन्मठेप तसेच दहा हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी ही केस यशस्वीपणे लढवली. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ. विनायक चव्हाण, वेदा मोरे यांनी महत्त्वपूर्ण तपास केल्याने हा खुनाचा गुन्हा उघड होऊन आरोपीला शिक्षा झाली आहे.