राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने १ जानेवारी २०२२ पासून होणार्या राज्य नाट्यस्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून १५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. यामुळे रत्नागिरीतील नाट्यसंस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे नाट्यस्पर्धा घेण्यात आल्या नव्हत्या. आता या स्पर्धा पुन्हा होत असल्याने सर्व नाट्यसंस्था सज्ज झाल्या आहेत.
साठाव्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारीपासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्यस्पर्धांची अंतिम फेरी १ फेब्रुवारीपासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. या नाट्यस्पर्धेकरिता तीन हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवायचा आहे. www.konkantoday.com