16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील


रत्नागिरी दि.15:- भारत निवडणूक आयोगाच्या 01 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.  या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर ग्रामसभेमध्ये मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी, तपासण्यासाठी तसेच या यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे.  गावातील सर्व नागरिकांनी मतदार यादीतील नोंदी तपासून घेणे, काही हरकती असल्यास, नोंदणी मध्ये दुरुस्ती असल्यास किंवा नाव नसल्यास पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदविण्याचे असल्यास त्यांना विहीत नमुना ग्रामसभेतच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या कार्यक्रमातंर्गत मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होवून परगावी गेलेल्या महिलांचे नाव वगळणी  तसेच लग्न होवून अन्य गावातून आलेल्या माहिलांची नाव नोंदणी तसेच दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे व ज्यांचे वय 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहे त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. 
            सदर ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नोंदणी NVSP पोर्टल/Voter Help line App वरुन कशा पध्दतीने करता येईल याची माहिती बीएलओ मार्फत देण्यात येईल.  याशिवाय 27 व 28 नोव्हेंबर 2021 या शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून नागरिकांकडून येणारे अर्ज स्विकारणार आहेत. 

            तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 16 नोव्हेंबर 2021 रोजीच्या विशेष ग्रामसभेत उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा.  तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button