सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवार 13 ऑगस्टला कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा हायवेवरील हुमरमळा येथे शिवसेनेच्या वतीने ‘चक्का जाम’ आंदोलन


कोकणवासीयांच्या, चाकरमान्यांच्या वेदना सरकार दरबारी पोहोचवून सरकारला जाग आणण्यासाठी बुधवार 13 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा हायवेवरील हुमरमळा येथे शिवसेनेच्या वतीने ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

कुडाळ एमआयडीसी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी कोकणवासीयांची व्यथा मांडत सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाची खड्डे पडून अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खरंतर हा महामार्ग 11 वर्षांपूर्वी सुरू झाला, मात्र सद्यस्थितीत या महामार्गाला अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. चौपदरीकरण रखडलेले आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग मागील गणेशोत्सवात पूर्ण होईल असे सांगितले होते. मात्र आता दुसरा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. अजूनही हा महामार्ग पुढील एक वर्ष पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे, असे ते म्हणाले. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, बाबल गावडे, दीपक गावडे, शोएब खुल्ली, गोट्या चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री सांगत आहेत की, खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवत आहेत ते कशाने बुजवत आहेत? ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने पैसे दिले जात आहेत. जनतेचे पैसे ठेकेदाराला मिळत आहेत. त्या पैशातूनसुद्धा ठेकेदार रस्त्यांचे खड्डे चांगल्या पद्धतीने भरत नाहीत ही शोकांतिका आहे. त्याविरोधातसुद्धा हे आमचे आंदोलन आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले.शिवसेनेने टोलविरोधात ओसरगांव येथे मोठे आंदोलन करून टोल थांबवला. जिह्यातील जनता, व्यापारी, शिवसैनिक एकत्र आले, त्यामुळे टोल थांबला. एपूणच वर्षाला 24 ते 25 कोटी रुपये म्हणजेच गेल्या तीन वर्षात 70 ते 75 कोटी रुपये लोकांचे वाचले. आजही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याविरोधात शिवसेनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, त्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button