
गुहागरमधील ५ जि.प. गट आणि १० पं.स. गणासाठी भाजपा सज्ज; महायुतीला प्राधान्य
गुहागर नगर पंचायतीमध्ये युतीच्या माध्यमातून दैदीप्यमान यश प्राप्त केल्यानंतर माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणातील विजयासाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सज्ज झाली आहे.
माजी आमदार डॉ. नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर नगरपंचायत प्रभारी म्हणून यशस्वी काम करणारे जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, तालुका अध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश रांगळे, तालुक्याचे कोषाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैताकर यांच्या प्रमुख नियोजनात आणि उपस्थितीत गुहागर तालुक्यामध्ये ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणाच्या भाजपा बुथ कार्यकर्त्यांच्या सभा झाल्या.
देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना याचा फायदा गुहागर तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घ्यायचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नक्की केले आहे. त्यानुसारच डॉ. नातूंनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.
गुहागर तालुक्यामधील पडवे, वेळणेश्वर, कोंडकारुळ, शृंगारतळी आणि असगोली जिल्हा परिषद गट या बरोबरच पडवे, पाचेरी सडा, वेळणेश्वर, शिर, कोंडकारुळ, मळण, शृंगारतळी, तळवली, असगोली आणि अंजनवेल या दहा पंचायत समिती गणाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या सभा मोठ्या उपस्थितीत झाल्या असून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपाची तयारी झाली आहे.
असे असले तरी देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महायुतीलाच प्राधान्य देणार असल्याचे यावेळी माजी आमदार डॉ. नातू यांनी सांगितले आहे; मात्र भाजपा कोणत्याही जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात लढत देण्यासाठी तयार असल्याचे यावेळी जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे यांनी सांगितले.




