कै. ॲ‍ड. भरत भोसले-एका सहृदयी, नम्र आणि दिलखुलास यशस्वी विधिज्ञाची एक्झिट..

ॲ‍ड. धनंजय ज. भावे (9422052330)

शनिवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी आमचे मित्र ॲ‍डव्होकेट भरत भोसले यांचे दु:खद निधन झाले. आधी हृदयविकार, मग कर्क रोग, त्यानंतर फुफ्फुसाचा आजार आणि प्रकृती सुधारत असतांनाच अचानक सर्व रोगांनी एकदम केलेला उठाव अशी गेली 7-8 वर्षांची निधड्या छातीने दिलेली त्याची झुंज दुर्दैवाने अपयशी ठरली याचे खूप वाईट वाटले. या सर्व कालावधीमध्ये भरतची माझी भेट जेव्हा जेव्हा झाली त्यावेळी तो नव्या उमेदीने रोगांना सामोरा जाताना मी त्याला पाहिले होते. तेव्हाही तो म्हणायचा बोनस आयुष्य आहे. मी त्याला म्हणत असे, वकीलसाहेब कोर्टात जाणे आणि वेगवेगळ्या केसेसचा अभ्यास करणे हेच तुमचे टॉनिक आहे, रोग विसरून जा. तोही म्हणत असे खरे आहे तुझे, त्याच्यावरच मी आजपर्यंत तग धरून आहे. परंतु पंधरा दिवसांच्या व्हेंटिलेटरनेच अखेर त्याचे टॉनिक बंद केले आणि त्याचा तो श्वासही थांबविला.

त्यांचा माझा तसा सुमारे 30 वर्षापासूनचा परिचय. कै. अमृतराव, त्याचे वडिल माइया वडिलांकडे येत असत. त्यांचा मुलगा वकील म्हणून भरत मला माहिती. माझा जवळचा मित्र ॲ‍डव्होकेट बाबा परूळेकर यांचा पुण्याच्या लॉ कॉलेजचा वर्गमित्र म्हणून भरतचा जवळून परिचय झाला. वकीलीच्या व्यवसायामध्ये आल्यानंतर परूळेकर ऑफिसमधील माझा नेक्स्ट सिनिअर कै. ॲ‍ड. सचिन सावंत याचा भरत मामा, त्यामुळे त्याच्या सहवासामध्ये मी आणखी जवळ आलो. आणि हळूहळू वकील म्हणून भरतच्या व्यवसायाला जवळून बघण्याची संधीही मिळाली. भरत म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व, चेहरा सदैव हसतमुख आणि आनंदी स्वभाव ! वकीलाच्या पेहेरावातच नव्हे तर अन्य कोणत्याही वेळी भरतला गबाळ्या वेशात कधीच कोणीही बघितलेले नसावे. व्यवसायामध्ये अत्यंत शिस्तप्रियता ही भरतची खासियत होती.

काही वर्षांपूर्वी भरतचे आमचे नातेसंबंध आले आणि मैत्री अधिक दृढ झाली. गप्पांची आणि जास्त करून अनुभवांची देवाण-घेवाण सुरु झाली. वकीलीमधील त्याचे इतके अनुभव ऐकले आणि मैत्रीबद्दल आदर निर्माण झाला. भरत एका दुर्धर रोगाला सामोरा जाऊन चीनमधून ट्रीटमेंट घेउन परत आला होता. तेथे कोरोनाची सुरुवात नुकतीच झाली होती पण भरत आणि त्याचे कुटुंबीय केवळ नशिब बलवत्तर म्हणूनच सुखरुप परतले होते. अगदी गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये भरतकडेच ज्युनिअरशिप केलेल्या माझ्या वकील भाच्याच्या ऑफिसचा शुभारंभ भरतने केला. त्या भेटीमध्ये दुर्धर रोगातून मुक्त होऊ पहात असलेला भरत मला त्याच्या वकीलीच्या व्यवसायातील आरंभापासूनचे अनुभव भरभरून बोलत होता. भरतने ज्या काळात चिपळूणमध्ये वकीली सुरु केली तेव्हा त्याकाळातील दिग्गज वकील व्यवसाय करीत होतेच. कोणाकडेही उमेदवारी न करता परिस्थितीशी झगडत एकला चलो या तत्वाने भरतने त्याचा व्यवसाय सुरु केला हे त्याचे वैशिष्ट्य असे मला त्याचे अनुभवांवरून वाटले. सकाळी उठल्यानंतर जसे देवतार्जन करायचे त्याचप्रमाणे रोज सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि एव्हिडन्स ॲ‍क्ट या पुस्तकांच्या अनुक्रमणिकांचे वाचन न चुकता दररोज करायचे आणि कामाला लागायचे असा त्याने दिनक्रम चालू ठेवला होता. फौजदारी विषयाची आवड असल्याने त्या अभ्यासाकडे त्याने विशेष लक्ष दिले आणि अल्पावधीत व्यवसायामध्ये चांगलीच प्रगती केली. प्रगती चालू असतांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. त्यामध्ये जेष्ठाकडूनही तसे अनुभव आले पण भरतने कोणालाच दोष न देता कायद्याचा खूप अभ्यास करून आपले पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य चालू ठेवायचे हे एकच उद्दीष्ट ठेवून सातत्याने प्रक्टीस सुरु ठेवली. आणि त्याचमुळे तो यशस्वी झाला.

बोलण्यात मृदुता पण कुठेही भित्रेपणाचा लवलेशही नाही अशा भूमिकेतून भरतने वकीली केली. मला त्याच्या एका गोष्टीचे नक्कीच कौतुक वाटते की एका प्रसंगी त्याने एका ज्युडिशअल अधिकारी याचेविरुध्दही प्रकरण चालविले होते. या कामामध्ये त्याला कोणत्याही सहव्यावसायिकाचा दूरान्वयानेही पाठिंबा नव्हता तरीही त्याने ते प्रकरण चालविले होते. हे ऐकत असतांना मला असे वाटले की पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही रिस्क घेण्याची भरतची तयारी असे. व्यवसायामध्ये त्याने अनेक मित्रमंडळी जमविली जी त्याचेवर सदैव प्रेमच करीत राहिली. अलिकडेच मी लिगल इगल्स असे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये भारतामधील सुप्रसिध्द आणि टॉप कायदेतज्ञांची चरित्रवजा माहिती देण्यात आली आहे. ते वाचत असतांना माझ्या मनात विचार आला. छोट्या छोट्या गावांमध्ये आपल्या अभ्यासूवृत्तीने, स्वत:च्या व्यावसायिक मेहनतीने वकीलीच्या व्यवसायात यशस्वी झालेले भरत भोसले यांच्यासारखे अनेक वकील होते आणि आहेतही. त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय वकीलीच्या व्यवसायात नव्याने पदार्पण करणा-याना झाला तर त्याचा त्यांना फायदा नक्कीच होईल असे वाटले म्हणून कै. भरतविषयी हे चार शब्द लिहिले आहेत. खरे तर मी त्याला सांगितले होते आपण तुझे अनुभव शब्दांकित करूया, पण त्याच्या आजाराच्या साठमारीत ते राहून गेले शेवटी याची खंत वाटून राहिली आहेच.

न्यायालयातील कर्मचारी वर्गाशीही त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते हे मी तो रत्नागिरीला येत असे तेव्हा पाहिले आहे. भरत काम करणा-या व्यक्तिजवळ कृतज्ञता दाखवत असतांनाच त्याचे कौतुकही करीत असे असा त्याच्या मित्रमंडळीनी नक्कीच अनुभव घेतला असेल. अगदी साधा अनुभव मी घेतला आहे त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. रत्नागिरीच्या कोर्टात भरत आला असतांना त्याला दुसरया मजल्यावर चढत असतांना माइया मुलाने त्यांची पुस्तकांची बॅग वर नेण्यास मदत केली. त्याचवेळी मुलाच्या लक्षात आले की भरतला जीना चढल्यावार खूपच दम लागला होता. मुलाने त्याना सहजच सांगितले, काका तुम्ही एकदा डॉक्टरांकडून तपासून घ्या. लगेचच चिपळूणला परतल्यानंतर त्याने तपासणी करून घेतली आणि काही कालावधीमध्येच त्याने ॲ‍जिओप्लास्टी करून घेतली. जेव्हा जेव्हा भरतची भेट होत असे तेव्हा तेव्हा तो तुझ्या या मुलाने माझे आयुष्य वाढविले आहे असे तो आवर्जून सांगत असे. अशा साध्या साध्या गोष्टीचेही त्याला सतत भान असे.

भरतचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे आपल्याजवळ काम करीत असलेल्या आणि नसलेल्याही सर्वच ज्युनिअरना त्याने हातचे काहीही राखून न ठेवता प्रॅक्टीकलसह सर्व ज्ञान दिले इतकेच नव्हे व्यवसायामध्ये त्यांना स्थिर करण्यासाठी सर्व प्रकारची मदतही केली. त्याचे काही ज्युनिअर आता ज्युडिशिअरीमध्ये काम करीत आहेत. याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांनाही भरतने वेळोवेळी सामाजिक जाणीवेतून आर्थिक आणि अन्यही प्रकारे सहकार्य केले आहे. दान देताना या हाताचे त्या हाताला कळू नये असे म्हणतात आणि भरतच्या बाबतीत तेच सत्य होते. याचकाला भरतकडून कधीही वंचित होऊन परत जावे लागले नाही असा अनुभव खूप जणाना नक्कीच आला असेल. गोरगरीबांचा भरत दाता होता. त्याच्या दानशूर स्वभावामुळेच भरतचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यांनाही जवळचा मित्र गमावला असल्याचे सतत जाणवत असेल.

भरतच्या भोसले कुटुंबियांचे अनेक सदस्य आहेत. आपापल्या ठिकाणी ते स्थिरस्थावर असले तरीही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्यात भरतविषयी अदबीचे प्रेम होते. तो स्वत: जसा कुटुंबातील जेष्ठांचा मान ठेवत असे तसाच त्यालाही प्रेमाचे आदराचे स्थान होते हे मी अनुभवले आहे. भरतच्या निधनाने ख-या अर्थाने भोसले कुटुंबियांच्या आबालवृध्द सदस्यांमधील एक महत्वाचा दुवाच निखळून पडला आहे याची जाणीव त्यांचेबरोबरच आम्हालाही आहे. लवकरच तो दुवा नव्याने सांधला जावा ही त्याच्या कुटुंबियांसाठी परमेश्वराजवळ प्रार्थना. कै. भरतला विनम्र श्रध्दांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button