मालगुंड हे कवितेचे पवित्र तीर्थक्षेत्र : कवी अरुण म्हात्रे मालगुंड येथे कवितांची काव्यमैफल संपन्न
मालगुंड : रत्नागिरी जिल्ह्यातील कवी केशवसुतांच्या जन्मगावी म्हणजेच मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट म्हणजे आता ती फक्त भेट राहिली नसुन, तर येथे आल्यानंतर साहित्याने मंतरलेल्या जागेतील पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिल्यासारखे वाटते असे मत ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.
ते कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे आले असता छोटेखानी काव्यवाचनाच्या वेळी बोलत होते. मालगुंड येथे नुकतेच छोटेखानी काव्य संमेलन संपन्न झाले.
ते पुढे म्हणाले की, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्वस्त प्रमुख मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कवी केशवसुत यांच्या घराचे स्मारक करून आम्हा साहित्यिक मंडळींना खूप मोठे स्थान मिळवून दिले आहे. कारण या स्मारकात आले की, नवी ऊर्जा निर्माण होते. जी आम्हाला नवीन मार्ग शोधण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे हे स्मारक भविष्यात कवितेचे तीर्थक्षेत्र बनत आहे.
यावेळी कवी अरुण म्हात्रे यांच्यासह उपस्थित कवींनी कविवर्य केशवसुत यांच्या कवितांबरोबर कविवर्य वसंत बापट, इंदिरा संत, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, अशोक नायगावकर, संभाजी भगत, किरण येले, आरती देशमुख यांच्या कवितासह स्वतःच्या कवितादेखील सादर करत काव्य मैफल गाजविली.
या निमंत्रितांच्या काव्य मैफिलीची सुरुवात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या परिवारातील ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या अनेक आठवणी कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितल्या.
यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले. त्यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या काव्य संमेलनात कवयित्री अमृता नरसाळे, निवेदिका दीप्ती कानविंदे, युवा कवी अरुण मोर्ये, गझलकार अमेय धोपटकर, नंदिनी देसाई यांनी भाग घेतला.
यावेळी उपस्थित असणारे यासिन पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
www.konkantoday.com