चाकरमान्यांवर रेल्वे मंत्रालय मेहेरबान , गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित ८विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय
कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाश्यांच्या सोयीसाठी वातानुकूलित ८ विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांनी जाहिर केले.
रेल्वेच्या वातानुकूलित विशेष गाड्या गणपती उत्सव-2021 दरम्यान आधीच घोषित करण्यात आलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त आहेत. कोकणामध्ये जाणाऱ्या आबालवृद्धांना ह्या सोयीचा लाभ घेता येईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही व गरजेनुसार आणखी सोय करण्यात येईल, कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने सोडलेल्या 72 गाड्या फुल झाल्यामुळे अधिकच्या गाड्यांची मागणी आशिष शेलार यांनी 23 जुलै रोजी केली होती. त्यानुसार अजून 40 गाड्या सोडण्याची घोषणा दानवे यांनी केली होती. त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी 112 गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतरही जर प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार शेलार यांनी आभार मानले होते.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता 72 रेल्वेच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, वेटिंग लिस्ट मोठी असल्याने कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकच्या 40 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई-कोकणवासियांसाठी वेटिंग लिस्ट वाढली तर अधिकच्या ट्रेन देऊ. ट्रेनचा खोळंबा होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना नियमांचं पालन करूनच प्रवास करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
www.konkantoday.com