
उमेश शेट्ये असताना ज्या लोकांनी त्यांना सतत विरोध केला ती मंडळी राजकारणासाठी एकत्र ः म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचा घणाघाती आरोप
रत्नागिरी ः रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये हे असताना त्यांना ज्यांनी आयुष्यभर विरोध केला ती मंडळी आता शहर विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आली आहेत. उमेश शेट्ये यांचे कर्तृत्व व नेतृत्व शहराने पाहिले आहे. त्यांची राजकीय कुवत या स्थापन झालेल्या आघाडीमधील कुणाकडे आहे का? असा सवाल म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. शेट्ये यांच्या कारकिर्दीला ज्यांनी सतत विरोध केला व त्यांचे श्रद्धास्थान असलेला तेलीआळी नाक्यावरील पारही ज्यांनी पाडला व उमेश शेट्ये यांनी ज्याला पारावरचा मुंजा अशी उपमा दिली ती मंडळी उमेश शेट्ये यांच्या कारकिर्दीचा फायदा घेण्यासाठी आघाडीच्या रुपाने या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पुढे आली आहेत ही सर्व वस्तुस्थिती जनतेला माहित आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठिशी उभी राहणार आहे.
उमेश शेट्ये हे माझे केवळ राजकीय प्रतिस्पर्धी होते. उमेश शेट्ये यांची कारकिर्द कोकणनगर मधून सुरू झाल्याने तेथे म्हाडातर्फे होणार्या बॅडबिंटन हॉल सभागृह व जीम यांना उमेश शेट्ये यांचे नाव आम्ही देण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे सहा पक्षाची मिळून झालेल्या या आघाडीमुळे नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत काहीही फरक पडणार नाही. उलट ही आघाडी निवडणुकीपर्यंत टिकते का? हे पहावे लागेल.
ही पोटनिवडणूक आमच्या दृष्टीने अतिशय सोपी आहे. शिवसेनेचे उमेदवार बंड्याशेठ साळवी हे बहुमताने गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी या निवडणुकीत निश्चित विजयी होणार असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com