चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार आज सोमवारी (ता. 23) एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीत केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार आज सोमवारी (ता. 23) एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने जाहीर केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सराफी पेढ्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष खेडेकर यांनी सांगितले.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले आहे. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती; परंतु बीआयएसने शुद्धतेच्या 4 प्रमाणित शिक्क्यामंध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची पध्दत राबविण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर ही पध्दत लागू करताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. त्यामुळे व्यापार्यांनाही नाहक पेपर वर्क वाढले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनतर्फे लाक्षणिक संप केला जाणार असल्याचे राज्याचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी जाहीर केले. त्यांना पाठिंबा देत रत्नागिरी सराफ संघटनेनेही या बंद मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार असून सर्व सराफी दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
www.konkantoday.com