मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही!शिवसेनेची टीका
मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही!
तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर असा इशाराच सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला दिला आहे.
तसेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
www.konkantoday.com