
चिपळुणातील महापुरात अडकलेल्या ६० जणांची सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकांनी सुटका केली.
चिपळुणातील महापुरात अडकलेल्या ६० जणांची सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकांनी सुटका केली. शुक्रवारी सकाळी १०.३० वा. पर्यंत हे मदतकार्य करण्यात आले. पुरात अडकलेल्यांचे जे खाण्यापिण्याचे हाल झाले ते हाल या पथकांचेही झाले. तरीही मदतकार्य जोमाने सुरू होते. पुराचे पाणी ओसरताना मदतीसाठी आणलेल्या फायबर बोटी चालतानाही अडचणी आल्या. मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी संतोष देसाई, दीप्ती साळवी यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना झाली होती. सुटका करण्यासाठी फायबर बोटी नेण्यात आल्या. धोकादायक परिस्थितीतही ६० जणांची पथकाने सुटका केल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी पाऊस थांबल्यानंतर मदतकार्यात वेग आला. पुराचे पाणी उतरणीला लागले, तेव्हा पाण्याचा वेग जोरात होता. उतरणीच्या या पाण्याला ओढ असल्याने मदतीसाठी आलेल्या हलक्या बोटी चालवणे धोकादायक बनले. तरीही मदतकार्यात खंड पडलेला नाही. www.konkantoday.com