जगबुडी पुलाजवळ जीवघेणे खड्डे; भीषण अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे भीषण अपघात होण्याची वाट न पाहता महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार एजन्सीकडून या ठिकाणचे धोकादायक खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी होत आहे.
मुंबई गोवा महामार्ग सध्यस्थितीत अतिशय धोकादायक झालेला आहे. ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम रखडले आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, भोस्ते किंवा परशुराम या घाटांमध्ये रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी यामुळे महामार्गावरून वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवणे हे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे काम आहे. त्यांनी ते करायला हवे मात्र खेड तालुक्यात चौपदरीकरणाचे काम करणारी ठेकेदार कंपनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
मुंबई गोवा महामार्गावर असेलेल्या जगबुडी नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाल्याने गेल्यावर्षापासून वाहतुकीस बंद करून नव्या पुलावरून वाहतूक वळविण्यात आली. मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांचे काम ठेकेदार कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्ते खड्ड्यात गेलेले आहेत. जोडरस्त्यांवर पडलेले खड्डे ठेकेदार कंपनीने वेळेत बुजविले असते तर इथे अपघातांचा तितकासा धोका राहिला नास्ता मात्र संबंधित ठेकेदार कंपनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत काहीच हालचाल करत नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांवर पडलेले खड्डे भीषण अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button