ग्रंथालयां बाबत चा उदासीन दृष्टिकोन बदलून वाचनालये सुरू करण्यास परवानगी द्या ;-अँड. दीपक पटवर्धन
कोरोनाच्या कालखंडामध्ये सर्व क्षेत्र कमी-अधिक प्रमाणात अडचणीत आहेत. त्यामध्ये ग्रंथालयीन चळवळ फार मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. लॉकडाउनच्या कालखंडामध्ये ग्रंथालये पूर्णपणे बंद आहेत. अन्य सर्व व्यवहार सुरू होऊन काही कालखंड झाला मात्र अद्याप पर्यंत वाचनालये सुरू करण्यासाठी प्रशासनाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत.
वाचक बंद वाचनालया मूळे अस्वस्थ
वाचनालये बंद असल्यामुळे वाचकांना त्यांच्या प्रिय पुस्तकांपासून दूर राहावे लागत आहे. नियमित पुस्तके वाचणाऱ्या वाचकांची बौद्धिक खुराक या लॉक डाउन मधील बंद वाचनालयामुळे बंद झाला आहे.वाचक ग्रंथालयात येता येत नाही म्हणून प्रचंड अस्वस्थ आहेत.
मौल्यवान ग्रंथांच्या देखभाली चा मुद्दा गंभीर ग्रँथसंपदा नाश पावण्याची शक्यता
दुसऱ्या बाजूला वाचनालया मधील ग्रंथ त्यांची देखभाली चा मुद्दा दुर्लक्षित रहात आहे. प्रामुख्याने पावसाळी वातावरणात जमणारे बाष्प तसेच वाळवी सदृश्य कीटक यामुळे ग्रंथांच्या संरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. वाचनालय संपूर्ण बंद असल्यामुळे पुस्तकांच्या देखभालीकडे लक्ष देणे अशक्य झाले आहे .त्यामुळे मौल्यवान ग्रंथसंपदा नाश होऊ शकते अशी स्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. वाचनालयामध्ये पुस्तकांची देखबाल याला अनन्यसाधारण महत्त्व असते. वाचनालय बंद असली तरी वाचनालयातील ग्रंथांची योग्य देखभाल सातत्याने करावी लागत आली आहे .पुस्तके पुसून नीट ठेवणे, वाचनालायातील मधील ग्रंथ ठेवलेल्या जागेमध्ये हवा खेळती राहील की ज्यामुळे बाष्प धरणार नाही,यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने करणे आवश्यक असते. कोकणामध्ये वाळवी लागण्याचे प्रमाण मोठे आहे. वाळवीचा प्रचंड धोका ग्रंथालयातील पुस्तकांसाठी होतो. त्यामुळे वाळवी प्रतिबंधक फवारणी सातत्याने करून घेणे आवश्यक असते.
वाचनालये बंद तरी खर्च अनिवार्य
म्हणजेच वाचनालय बंद असले तरी पुस्तकांच्या देखभालीसाठी व्यवस्था अपरिहार्य ठरते. त्यासाठी लागणारा खर्च करणे वाचनालयासाठी अपरिहार्य ठरते.वाचनालयाचे वर्गणी तसेच अन्य उत्पन्न सद्यस्थितीत बंद आहे. शासनाने गतवर्षीची तसेच चालू वर्षातील अनुदाने वाचनालयाना अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे वाचनालयाचे नियमित खर्च पगार, लाईट बिल ,पाणी बिल, मेन्टेनन्स हे अव्याहतपणे सुरू आहेत. मात्र उत्पन्न पूर्ण ठप्प झाले आहे .त्यातच वाचनालय बंद असल्यामुळे वाचकांची नाराजी वाचनालय आवर निघत आहे.
वाचनालयाची अनुदाने अद्याप प्रलंबित वाचनालये आर्थिक संकटात
शासनाने वाचनालयाचे गतवर्षीचे अनुदान अद्यापही पूर्ण प्रमाणात वाचनालयांना दिलेले नाही .तसेच चालू वर्षाच्या अनुदानाचा एकही टप्पा अद्याप पर्यंत वाचनालयांना अदा केलेला नाही .त्यामुळे वाचनालय आर्थिक संकटात सापडली आहेत. वाचनालये सुरू करण्यासाठी शासनाने किंबहूना स्थानिक प्रशासनाने आता सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे .रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सुरू करण्यास परवानगी मिळावी म्हणून आज पर्यंत अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे ग्रंथालय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यासंदर्भात योग्य योग्य पाठपुरावा करूनही कोरोना चा प्रसार या मुद्द्यावर ग्रंथालय सुरू करण्यास उद्यापर्यंत हिरवा झेंडा प्राप्त झालेला नाही. मात्र प्रशासनाने कोरोना संदर्भात सुरक्षिततेचे उपाय कडक पद्धतीने पाळण्याचे निर्देश देत मास्क चा वापर सॅनेटायझरचा वापर, तसेच गर्दी टाळणे आदीबाबत व्यवस्थापक मंडळाचे हमीपत्र घेऊन वाचनालये सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा ग्रंथालय चळवळ मोडून पडेल .वाचक आपली वाचन तृषा भागविण्यासाठी अन्य साधनांचा वापर करू लागतील. त्यामुळे ग्रंथालयांचे अस्तित्व अडचणीत येईल.
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली
ग्रंथालयांमध्ये काम करणारे कर्मचारी हे पूर्णांशाने वाचनालयातील यांच्या वेतनावर विसंबून आपला उदरनिर्वाह करतात मात्र वाचनालय बंद असल्यामुळे व वाचनालयांचे उत्पन्न पूर्ण ठप्प झाल्याने, वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करणे जिकिरीचे झाले आहे .ग्रंथालय सुरू करण्यासाठी वाचकवर्गाला आंदोलन करणे भाग पडावे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी
वाचनालयामध्ये प्रचंड गर्दी कधीही नसते त्यामुळे पुस्तकांची देवाण-घेवाण कोरोना प्रतिबंधक सुरक्षिततेचे उपाय राबवत चालू करणे खरेतर योग्य ठरणारे आहे. मात्र शासनाचे औदासिन्य आणि नकारात्मक भूमिका यामुळे ग्रंथालय चळवळ आज कोरोना महामारी पेक्षाही अधिकच्या संकटात सापडलेली आहे.
आंदोलनात्मक पवित्रा अनिवार्य होऊ देऊ नका
येत्या आठवड्यामध्ये शासनाने ग्रंथालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात्मक अभियान सुरू करावे लागेल. मात्र ग्रंथालय चळवळ वाचविण्यासाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन गरजेप्रमाणे आंदोलनात्मक पवित्रा घेणे भाग पडेल अशी वेळ येण्या पूर्वी वाचनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड. दिपक पटवर्धन यांनी केली आहे.