मुख्य रस्त्यावरच पाणी साठत असल्याने , शिवाजीनगरच्या रस्त्यावर पादचाऱ्यांची होतेय आंघोळ
रत्नागिरी शहरामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्त्यांची दैना झाली आहे. त्यातच रस्त्यांना आता तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. ही अवस्था व्हायला कारणही तसेच आहे. कारण रस्त्याला गटारच नसल्याने पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्यामुळे हे पाणी रस्त्यावरच साचत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना याच पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. शहरातील शिवाजीनगर या भागात मुख्य रस्त्याला गटार आहे. परंतु शिवाजीनगरहून मारुती मंदिरकडे येणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूला गटारच नसल्याने पाणी रस्त्यावर साचू लागले आहे. गेले दोन-तीन दिवस हे पाणी भरपूर प्रमाणात दिसत आहे. यामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी रहिवासी इमारत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ असते. तसेच मुख्य मार्ग असल्याने पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते आणि एसटी, ट्रकसह रिक्षा, दुचाकींची गर्दी असते. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून जाताना वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच पादचाऱ्यांची अक्षरशः रस्त्याच्या पाण्याने आंघोळच होते, पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ उडते.
या मार्गावर व्यावसायिकांची अनेक दुकानेही आहेत. त्यामुळे ग्राहकांना तिथे गाडी लावून दुकानात जाणे अडचणीचे ठरते. या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी नगरपरिषदेने तत्काळ हालचाली कराव्यात. कारण येथे गटार नसल्याने अशा प्रकारे पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडणार आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
www.konkantoday.com