लोटे माळवाडी येथून गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त ; संशयिताला अटक
खेड : तालुक्यातील लोटे माळवाडी येथून खेड पोलिसांनी गोवा बनावट चा सुमारे २६ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून निहार हेमंत वारणकर असे या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांकडून आले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशी-विदेशी मद्याची दुकाने बंद असल्याने अनेकजण गोवा बनावटीची दारू आणून ती चढ्या भावाने विकत आहेत. खेड पोलिसांनी गेल्या वर्षभरात अनेकांना हा अवैध व्यवसाय करताना रंगेहाथ पडकून त्यांच्यावर कारवाई केली आहे. लोटे माळवाडी येथील एका घरात गोवा बनावटीचा मोठ्या प्रमाणात मद्यसाठा असल्याची खबर खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक
पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांना मिळाली होती.गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार सुजीत गडदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोटे माळवाडी येथील एका घरावर अचानक धाड टाकली असता त्यांना वारणकर यांच्या घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी खेड पोलिसांनी निहार हेमंत वारणकर याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
लोटे परिसरात सुरु असलेले अवैध व्यवसाय उलथून लावण्याचा निर्धार खेड पोलिसांनी केला आहे. मात्र यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. एखाद्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु असेल तर त्याबाबत पोलिसांना तात्काळ खबर द्यावी असे आवाहन खेड्च्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांनी केले आहे.
www.konkantoday.com