रस्ता दुरुस्तीला पैसे नसतील तर तसं सांगा ,स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करून देऊ , रत्नागिरी नगरपरिषदेलाच दिले आव्हान
रत्नागिरी शहरातील राम आळी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याच्या मध्यभागी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी गटार सदृश स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजुला केवळ रिक्षा जाईल एवढाच रस्ता उरला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा करावा लागत आहे. या रस्त्यावर नगरपरिषदेने तातडीने खडी टाकून रस्त्याचे सपाटीकरण करून घ्यावे. नगर परिषद प्रशासनाला यात काही अडचणी असल्यास किंवा नगर परिषदेकडे खर्चासाठी निधी उपलब्ध नसल्यास तसे दोन दिवसात मला लेखी कळवावे. म्हणजे हा रस्ता मी स्वखर्चातून करून देण्यास तयार आहे, असे पत्र भाजप दक्षिणचे जिल्हा सचिव ऍड. महेंद्र मांडवकर यांनी रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी यांना पाठविले आहे.
या पत्रात म्हटले आहे की खोदलेला रस्ता हा नेहमीचा गर्दीचा आणि रहदारी चा आहे. खोदलेल्या रस्त्यावर संघवी फर्निचरच्या समोर एसटीचा थांबा ही आहे. त्यामुळे तेथे थांबणाऱ्या बस आणि प्रवाशांमुळे नेहमीच गर्दी होते. महिनाभरापूर्वी ही खोदाई झालेली असून जलवाहिनी तत्काळ टाकूनही झाली. तरीही रस्त्याचे काम केलेले नाही. महिनाभरापासून ही भयावह स्थिती आहे. या रस्त्याच्या कामासाठी पक्के डांबर टाकता येत नसले तरी खडी टाकून त्यावर रोलिंग करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
गेले ८ ते १० दिवस पाऊस सरीवर पडत असल्याने खडी टाकण्याचे हे काम करणे सहज शक्य होते. मात्र नगर परिषद प्रशासनाला सामान्य लोकांच्या सुरक्षिततेची अजिबात चिंता नाही. संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत सर्व प्रसार माध्यमाममध्ये बातम्या येऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही. नगर परिषद प्रशासनाने किमान शहरातील रस्त्यांची स्थिती पाहणे आवश्यक आहे. परंतु तसे घडताना दिसून येत नाही. त्यामुळे जर नगर परी हा खर्च जमणारा नसेल तर मला लेखी कळवावे. म्हणजे मी स्वतः रत्याचे काम स्वखर्चातून करून घेईन, असेही मांडवकर यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com