ऑटोमोबाईल इंजिनिअर ते कोळंबी शेती, कोकणातील तरुणाचा प्रवास
बहुतांश कोकणातील तरुणांचा कल शिक्षण घेऊन मुंबई-पुण्याकडे जाऊन नोकरी करण्याकडे असतो. परंतु काही तरुण असे असतात की जे कोकणात राहून मोठा व्यवसाय उभा करतात. सिंधुदुर्ग मधील एका उच्चशिक्षित तरुणाने कोळंबी शेती प्रकल्प सुरू केला आहे व या माध्यमातून तो रोजगारही उपलब्ध करून देत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील अपूर्व फर्नांडिस या उच्चशिक्षित तरुणाने आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात कोळंबी शेती प्रकल्प उभारला आहे. अपूर्व हा शिक्षणाने ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे. आचरा येथील पडीक खार जमिनीवर पंधरा एकर जागेमध्ये हा कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प त्याने उभारला आहे.या प्रकल्पातून तो शेकडो टन कोळंबी गोव्यासह महाराष्ट्रात पाठवतोय.कोकणात सध्या मत्स्य दुष्काळासारख संकट उभं ठाकलं आहे. माशांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मासे मिळण्याचे प्रमाण घटलं आहे. त्यामुळे नवे मत्स्य साठे निर्माण करण्यासाठी अपूर्वचा हा प्रयोग निश्चित उपयोगी ठरत आहे. मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाकडून विविध योजना सुद्धा राबवल्या जातात. अपूर्वचा व्यवसाय नक्कीच कोकणातील तरुणांना व्यवसायाकडे वळण्याकरिता प्रोत्साहित करेल.