कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कारांचे थाटात वितरण

शोभा नाखरे यांचे सकारात्मकतेवरील भाषण ठरले प्रेरणादायी

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण रविवारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांच्या हस्ते थाटामाटात झाले. याप्रसंगी शोभाताईंनी संकल्प सकारात्मकतेचा यावर दिलेले भाषण सर्व श्रोत्यांना आवडले आणि प्रत्येक उदाहरणांवेळी श्रोत्यांच्या टाळ्या पडत होत्या.

राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. सौ. शोभाताईंनी सकारात्मक वृत्तीच्या अनेक उदाहरणांतून आपण कसे सकारात्मक जगले पाहिजे, याविषयी विस्तृत विवेचन केले. शोभाताई म्हणाल्या की, माणसाची लहानपणापासूनच नकारात्मक बोलण्याची वृत्ती असते. पण आपण समाजात समाजभान दिसले की चांगुलपणाचा गुणाकार केला पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे लागू नये. मन सकारात्मक असेल तर आपण असंख्य चांगल्या गोष्टी समाजात घडवू शकतो. ध्येय पक्के असले पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सकारात्मकता अंगिकारली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांनी केले.

यांचा घ्या आदर्श- शोभाताई
वयाच्या ८७ व्या वर्षी बीए झालेल्या चटर्जी आजी, दुर्धर आजारावर मात करत फोटोग्राफीत नाव कमावणारा रत्नागिरीचा अक्षय तथा अक्की परांजपे, “माउंटन मॅन” म्हणजे हातोडी, छिन्नीच्या साहाय्याने २२ वर्षे डोंगरातून रस्ता खोदणारा दसरथ मांझी यांच्या उदाहरणांतून सभागृहात वातावरण सकारात्मक बनले. दिव्यांगांच्या अनेक सकारात्मक कथाही त्यांनी सांगितल्या.

याप्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये संघाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच शताब्दी सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष मानस देसाई यांनी आभार मानले.

यांचा झाला विशेष सन्मान
समर्थ भारत अभियानांतर्गत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त प्रवीण जोशी आणि शारदापीठ शृंगेरी येथे झालेल्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांकप्राप्त सौ. मीरा नाटेकर या दोघा भावंडांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकलने यशस्वीरित्या प्रवास करणाऱ्या डॉ. सौ. अश्विनी गणपत्ये यांच्यावतीने मुलगी व सासू-सासरे यांनी पुरस्कार स्वीकारला. पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ. सौ. अश्विनी देवस्थळी व डॉ. पंकज घाटे यांना सन्मानित केले.

कार्यक्रमात मंचावर अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. प्रभुदेसाई आणि सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी केले.

सत्कारमूर्तींनी मानले आभार
मी संघाच्या वसतीगृहाचा माजी विद्यार्थी असल्याने रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने केलेला सन्मान घरचाच असून याबद्दल डॉ. पंकज घाटे यांनी आभार मानले. मनाचे श्लोक व सामाजिक संस्कारासाठी मी नेहमी उपलब्ध असल्याचे प्रवीण जोशी म्हणाले. तर करिअर कौन्सिलिंगसाठी मी मदत करेन, अशी ग्वाही डॉ. अश्विनी देवस्थळी यांनी दिली. डॉ. गणपत्ये यांचे मनोगत मुलीने वाचून दाखवले, सायकलवरून अयोध्यावारी व हा सन्मान प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button