खेडमधील त्या प्रकारानंतर आता लहान मुलांची देखील काळजी घ्यावी लागणार
साधी सर्दी पडसं,कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत तरीदेखील खेड तालुक्यातील एका गावात एकाच कुटुंबातील चार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने खळबळ उडाली आहे. १४ , १०, ६ आणि २ या वयोगटातील ही मुले असून त्यांना खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांचे आई-वडील कोरोनाबाधित असल्याने मुलांचीही चाचणी केली असता कुटुंबातील चारही मुले कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सुसेरी नंबर १ देऊळवाडी येथिल एका कुटुंबातील पती-पत्नीची तपासणी केली असता ते दोघेही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर त्यांच्या १४, १०, ६ आणि २ वर्षांच्या मुलांची तपासणी केली असता चौघांचीही कोरोनाचाचणी पॉसिटीव्ह आली . या चारही मुलांना फारशी लक्षण नसली तरी त्याची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी हा खेड तालुक्यातील अलसुरे गावातील गेला. त्यानंतर दुसऱ्या लाटेचे सर्वाधिक रुग्ण हे खेड तालुक्यातील सनघर या गावात मिळाले. आता कोरोनाबाधित असलेली चार लहान मुले ही देखील खेड तालुक्यातच आढळून आली असल्याने खेडवाशियांची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना अदयाप आटोक्यात आलेला नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच डेल्टा प्लस चे रुग्ण देखील रत्नागिरीत आढळून येत आहेत. हे कमी की काय म्हणून आता कोरोनाबाधित मुलेही रत्नागिरी जिल्ह्यातच आढळून आली असल्याने जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबरटयावर उभा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी या बाबत बोलताना चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सुसेरी देऊळवाडी येथे चार मुले कोरोनाबाधित आढळून येणे ही बाब पालकांबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढविणारी आहे. लहान मुलांमध्ये सर्दी खोकला हा आजार सर्रासपणे पाहावयास मिळतो. याकडे तितक्याशा गांभीर्याने पहिले जातेच असे नाही परंतु आता सर्दी खोकला हा आजार म्हणजे कोरोना असू शकतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या सर्दी खोकला या आजाराकडे दुर्लक्ष न करता मुलामध्ये सर्दी खकल्याची लक्षणे दिसताच त्यांची कोरोना चाचणी करून घावी असे आवाहन डॉ मोरे यांनी केले आहे.
दरम्यान ही चारही कोरोनाबाधित मूले येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com