
सीए विद्यार्थ्यांसाठी टेल अभ्यासक्रम- सीए मनिष गादिया
रत्नागिरी, : सीएचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना रोजगार व अनुभव मिळावा, कौशल्यविकास व्हावा, यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘ट्रेन, अर्न अँड लर्न’ (टेल) हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना सीएकडे इंटर्नशिप देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर त्याला मानधन मिळणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए. मनिष गादिया यांनी दिली.
येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोरोनानंतरच्या काळात राबविण्यात येणारे उपक्रम, विविध बदल, विद्यार्थी व सीएंसाठी आणलेल्या तरतुदी याविषयी या वेळी माहिती दिली. या वेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, डब्ल्यूआयआरसीच्या उपाध्यक्षा सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, ‘विकासा’चे अध्यक्ष सीए यशवंत कासार, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित, उपाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर उपस्थित होते.
नोकरी किंवा व्यवसाय करण्यापूर्वी सीएकरिता नवनवी कौशल्ये विकसित व्हावीत, शिकतानाच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. साधारण ३६ तासांचा हा अभ्यासक्रम असून, त्याचे शुल्क २०० रुपये आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना सीएकडे इंटर्नशिप देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर त्याला मानधन मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुलभ मार्गाने सीए परीक्षेसाठी आवश्यक साहित्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. याबाबतची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे सीए यशवंत कासार यांनी सांगितले.
इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नेहमी सरकारला मदत होत असते. देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात चार्टर्ड अकाउंटंट्सची मागणी आहे. लेखापालन पद्धतीच्या प्रमाणीकरणामुळे परदेशातील कामेही रत्नागिरीत बसूनही करता येतील. सहकार क्षेत्रात सीएंची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या काळात सहकार क्षेत्राला अधिकाधिक गती देण्यासाठी सनदी लेखापाल आपले योगदान देतील, असे सीए चितळे यांनी सांगितले.
रत्नागिरीत शाखा सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थी परीक्षेला बसू लागले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळत आहे शाखेच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले जाते, असे शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित यांनी सांगितले.
यानंतर ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन आणि सीए नीळकंठ पटवर्धन यांचा सत्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सीए एच. एल. पटवर्धन यांनी आपला संघर्षमय प्रवास मांडला. त्या काळी साधने नसताना, मुंबईत जाऊन सीए होताना आलेल्या अडचणींवर केलेली मात आणि येथील प्रॅक्टीसमधील किस्से त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com