
आज झालेल्या लोकार्पण सुविधा बाबत सादरीकरणमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला सविस्तर आढावा
रत्नागिरी दि. 21:- तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या तयारीत बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम झाले अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आज रत्नागिरी शहरातील तीन ठिकाणच्या बाल कोविड केअर सेंटर आणि महिला रुग्णालय येथील ऑक्सिजन निर्मिती सुविधा याबाबत सादरीकरण दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले,त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील कामाबाबत समाधान व्यक्त केले.
आज अभिनव अशा बाल कोविड केंद्राचे तसेच महिला रुग्णालयातील बालकांसाठी च्या अतिदक्षता कक्ष आणि स्वस्तिक रुग्णालयातील बालरुग्ण सुविधेसह महिला रुग्णालयात असलेल्या ऑक्सीजन निर्मिती संयंत्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याबाबतची एक चित्रफित या वेळी दाखवण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव,आमदार राजन साळवी,नगराध्यक्ष बंड्या साळवी आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी यावेळी जिल्ह्यातील covid-19 स्थितीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहेत त्यासोबतच आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली आलेला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यात असणाऱ्या ऑक्सिजन सुविधेबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे व त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 840 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उभारण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com