
निसर्गाचा समतोल ढासळला आहे -मकरंद अनासपुरे.
यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाला, यातून निसर्गाचा समतोल ढासळला आहे हे स्पष्ट होते. खरंतर निसर्ग बोलत नसला तरी तो अशा पद्धतीने व्यक्त होत असतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलेयावेळी त्यांनी वृक्षारोपण हे काम कुण्या एकाचे नव्हे, तर त्याची चळवळ व्हायला हवी, यासाठी लोकसहभाग वाढायला हवा, अशी भावनाही मांडली.
महाराष्ट्र शासन वसुंधरा अभियान ग्रामपंचायत पिंपळी खुर्द, केदार काळकाई एंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून बुधवारी दुपारी पिंपळी खुर्द येथील श्री केंदार सुकाई मंदिर कमान येथे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड व मियावाकी जंगल निर्मितीचा शुभारंभ झाला. यावेळी प्रांताधिकारी व श्री. अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर छोटेखानी कार्यक्रम झाला. पिंपळी सरपंचांनी श्री. अनासपुरे यांचे स्वागत केले.यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले की, आज निसर्ग आपल्याला सूचना देत आहे, त्यामुळे निसर्ग जपला पाहिजे. पिंपळी ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्यावा, भविष्यात प्लास्टिकमुळे पाणी टंचाई उदभवू शकते. त्यामुळे आतापासून प्लास्टिकमुक्तीसाठी पुढे यायला हवे, असा संदेश अनासपुरे यांनी दिला.
आम्ही राज्यभरात वृक्षारोपण करीत आहोत. पुण्यातील खडकवासला धरणाच्या बाजूला मोठे जंगल उभे राहिले आहे. त्या ठिकाणी जैवविविधता वाढली तरच निसर्ग टिकेल. मात्र हे काम कुण्या एकट्याचे नाही. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने या कार्यात सहभाग घ्यायला हवा. या कार्यक्रमाला सर्वांची साथ मिळाली तर ही मोहीम पुढे जाईल त्याचे चळवळीत रूपांतर होईल. लावलेली झाडे जगवली पाहिजेत. त्यामुळे प्रत्येकाने लावलेल्या झाडांची जबाबदारी घ्या आणि ती जगवा, असे आवाहनही श्री. अनासपुरे यांनी केले.www.konkantoday.com