परदेशात जाणाऱ्यांसाठी लसीची दुसरी मात्रा द्या- रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
रत्नागिरी– परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी काेविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा उपलब्ध करण्याची मागणी रत्नागिरी भारतीय जनता युवा माेर्चा शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी तहसीलदारांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज तहसीलदारांना निवेदन पाठवले आहे.
रत्नागिरी शहरातील व परिसरातील अनेक नागरिकांना नाेकरीसाठी परदेशांत जायचे आहे. काही जण टाळेबंदीमुळे, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद असल्यामुळे परदेशांत जाऊ शकले नाहीत. तसेच त्यांची एक लस घेऊन झाली आहे. आता काही प्रमाणात विमान वाहतूक सुरू झाली असून कंपन्यांमधून या कर्मचाऱ्यांना बाेलावण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना त्वरित हजर व्हावे लागणार आहे. दुसरी लस काही कारणामुळे मिळाली नाहिये. त्यांना त्वरित लसीची दुसरी मात्रा मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी परदेशांत जायचे आहे.
नाेकरदार आणि विद्यार्थ्यांना परदेशांत जाण्यापूर्वी काेविड प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस होणे आवश्यक आहे. त्याकरिता लसीच्या दुसऱ्या मात्रेचा कॅंप घेण्यात यावा. जेणेकरून सदर नागरिकांची गैरसाेय हाेणार नाही. याचा गांभिर्याने विचार करून तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवीण देसाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत प्रवीण देसाई यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी, यांनाही दिली आहे.
www.konkantoday.com