पदाचा गैरवापर करणाऱ्या अनिल परब यांची पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी -माजी खासदार किरीट सोमय्या
सन २०१७ मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीतील ४२ गुंठे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात नव्हतो असे मूळ जागा मालक विभास साठे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यानंतर झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केला आहे असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पर्यावरणावर घाला घालत वाळूवर बांधलेले रिसॉर्ट, त्यातील आर्थिक गैरव्यवहार, पदाचा गैरवापर करणाऱ्या अनिल परब यांची पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी
सुद्धा त्यांनी केली.यावेळी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे हेही उपस्थित होते.
पालकमंत्री परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकामातील गैरव्यवहाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांचा हा तिसरा रत्नागिरी दौरा होता. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी साई रिसॉर्टच्या जागेचे मूळ मालक विभास साठे यांनी किरीट सोमय्या यांना लिहिलेले पत्रच सादर केले. या पत्रात विभास साठे यांनी जागा विकल्यानंतर झालेल्या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्री अनिल परब यांनी २ मे २०१७ रोजी १ कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून ४२ गुंठे शेत जमीन विकत घेतली, त्याचा ताबा घेतला. मात्र या जागेवर त्यानंतर ज्या अकृषिक (बिनशेती) परवानग्या करण्यात आल्या त्याच्या संबंधी कोणतेही कागदपत्र, शपथपत्र, अर्ज, जबाब इत्यादींवर आपण सह्याचं केल्या नाहीत किंवा कोणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही, त्या जागेवर कोणतेही बांधकाम केलेले नाही. १९ जून २०१९ ला खरेदीखताची औपचारिकता पूर्ण करतानाही ही शेत जमीन आहे, याच्या पश्चिम बाजूला समुद्र आहे असेही नमूद करण्यात आले होते,असे विभास साठे यांनी पत्रात नमूद केले आहे.
विभास साठे यांच्या या पत्रामुळे अनिल परब यांचे अनेक दावे खोटे ठरले असून त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले. जमीन विकल्यानंतर आपण कोणतेच व्यवहार केले नसल्याचे साठे म्हणत असल्याने अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून जागा घेतली व त्यावर रिसॉर्ट बांधला त्या संबंधीच्या बिनशेती परवानग्या बनावट सह्या करून, सरकारी दस्ताऐवजाशी खेळून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहारात विभास साठे यांच्या नावाने ४ सह्या असून त्यातील केवळ एक सही खरी असून बाकीच्या वेगवेगळ्या असल्याचे सोमय्या म्हणाले.
www.konkantoday.com