
सावर्डे बाजारपेठेत एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत एकाच रात्रीत ३ दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या दुकानातून हजारो रुपयांची रोकड व मोबाईल शॉपीतील साहित्य चोरून नेले. चोरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा गतीमान झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सावर्डे बाजारपेठेत चोरीसत्र थांबले असताना पुन्हा चोरीचा प्रकार घडल्याने बाजारपेठेतील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास सावर्डे बाजारपेठेतील बसस्थानकासमोर असलेली वक्रतुंड मोबाईल शॉपी, त्या लगतचे हार्डवेअरचे दुकान व डॉ. कांबळे याच्या दवाखान्यात देखील अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये मोबाईल शॉपीमधून चोरट्यांनी ५७ हजार ७०० रुपयांचे ब्लू ट्यूथ, स्मार्ट वॉच व अन्य मोबाईल एक्सेसरीज चोरीस गेले. त्याच्या बाजूला असलेल्या डॉ. अक्षय कांबळे यांच्या दवाखान्यातून २० हजारांची रोकड चोरीस गेली. ग्रामपंचायत समोर असलेल्या दिजी धनजी पटेल यांच्या लिंबानी हार्डवेअरमधून ७ हजाराची चोरी झाली.
www.konkantoday.com