चिखलमय रस्ते माथी मारणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला -राजीनामा देऊन घरी बसा ;- भाजपा ची मागणी
रत्नागिरी शहरात रस्ते खोदाई, पावसाचे आगमन या सर्वांमुळे अत्यंत वाईट स्थितीला जनतेला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने केवळ पोकळ घोषणाबाजी आणि तोरा मिरवणाऱ्या प्रवृत्ती सत्ताकेंद्र कवटाळून बसल्याने रत्नागिरी शहराची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांची इतकी दुर्दशा झालेली असताना कोणतीही ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. नगरपरिषदेने आवश्यक सुविधा पुरवण्याचे कर्तव्य विसरून केवळ पोकळ घोषणाबाजीच सत्र सुरू केले आहे. या सर्वांबद्दल सत्ताधीशांना खराब रस्त्यावर आणून जाब विचारण्याची वेळ आली आहे. योग्य नियोजन करण्याची दृष्टी सत्ताधाऱ्यांकडे नाही. पाणी योजनेचे घोंगड गेली ४ वर्षे भिजत पडले आहे. आता रस्ते खोदाईचा सपाटा लावून राजकीय अभिनिवेशातून जनतेला वेठीस धरणे चालू आहे. एन पावसाच्या तोंडावर रस्ते खोदाई करण्याचे सुपीक डोके कोणाचे ? हा प्रश्न पडला आहे. कारण रत्नागिरीमध्ये सत्ताबाह्य सत्ताकेंद्र खूप आहेत. अशा अकार्यक्षम प्रतिनिधींना रत्नागिरी शहराचा बट्ट्याबोळ करण्यासाठी, पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. जनाची नाही तर मनाची लाज बाळगत रत्नागिरीची दुर्दशा करणार्या सत्ताधारी प्रतिनिधींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भा.ज.पा. रत्नागिरी करत आहे
www.konkantoday.com