मंत्री महोदय व प्रशासना बरोबरच्या बैठकीत व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांची बाजू मांडत दोन प्रस्तावप्रशासनासमोर ठेवले
कोविड च्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन संदर्भात आज दि. २७ मे रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत (VC द्वारे) मा. जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक , निवासी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या समवेत व्यापारी महासंघाच्या (कोविड च्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत) शिष्टमंडळाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी राज्यस्तरावरील निकषांनुसार सध्या आपला रत्नागिरी जिल्हा “रेड झोन” मध्ये असल्याने शासनस्तरावर त्यासंबंधीचे निकष व “रेड झोन” मध्ये असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये असलेली सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक ह्यांनी सध्याची आपल्या जिल्ह्यातील कोविड रुग्णांची परिस्थिती, अर्थचक्राची परिस्थिती कथन केली व त्यावरून व्यापाऱ्यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले.व्यापारी महासंघाच्यावतीने रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई व शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे व त्यांचे सहकारी उपस्थित होते या बैठकीत व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या व्यापारी बांधवांची बाजू उचलून धरत व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती व इतर बाबी मांडून एकतर सर्वच व्यापाऱ्यांना शासन नियम पाळून दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अन्यथा प्रशासनाने ८ दिवस जनता कर्फ्यु प्रमाणे लॉकडाऊन जाहीर करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व ८ दिवसानंतर व्यापाऱ्यांना आपली दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे २ प्रस्ताव प्रशासनाला दिले. मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक ह्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या व म्हणणे गांभीर्याने ऐकून घेऊन व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावावर येत्या २ दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com