
रत्नागिरी शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; पहिल्याच दिवशी 15 हजार 700 रुपये दंड वसूल
रत्नागिरी : नगर परिषद आरोग्य विभागाच्या पथकाने प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार्या बाजारपेठेतील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. गुरूवारी पहिल्याच दिवशी 15 हजार 700 रुपये दंड वसूल केला. आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बाजारपेठ तसेच परटवणे, गाडीतळ, गोखले नाका येथील दुकानांमध्ये तसेच फळ विक्री करणार्या फेरीवाल्यांकडील प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली. दुकानांमध्ये लपवून ठेवलेल्या पिशव्या शोधून काढून कारवाई करण्यात आली. ‘माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत ‘सिंगल यूज प्लास्टिक’ विरोधात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा पिशव्या दुकानदारांनी वापरू नये, असे आवाहन दर दिवशी घंटागाडीवरून दिले जात होते. त्याचबरोबर गुरूवारी जाहिरात करून प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल वस्तू वापरल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.