
रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण!सरकारला वठणीवर आणण्यासाठी मी सिंघम, बाजीगर! सामंतांच्या घोषणांचा ग्रंथ होईल,माजी आमदार बाळ माने यांचे प्रत्त्युतर
रत्नागिरी- मंत्री सामंत हे राष्ट्रवादीतून आल्यामुळे शरद पवार हे त्यांच्या शाळेचे प्राचार्य होते. त्यांच्याकडून बाळकडू मिळाल्याने ते ‘डिव्हायडेड रूल’ (फोडाफोडी) करत आहेत. सामंतांच्या गोष्टी म्हणजे ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडेसारख्या आहेत. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हे आमचे नेते आहेत. त्यामुळे फोडाफोडी करू नये. रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. त्यासाठी सिंघम पाहिजे, बाजीगर पाहिजे. जिथे अन्याय होईल, जिथे सुविधा मिळणार नाहीत, तिथे सरकारला वठणीवर आणण्याकरिता मी सिंघम आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी केले.
झूम अॅपवर आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. माने म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे सरकारला मदत करावी अशी भूमिका होती. पण सत्ताधारी पक्षाने कसे बोलले पाहिजे ही जबाबदारीची संयम ठेवणे ही सत्ताधार्यांची जबाबदारी आहे. गेल्या रविवारी ४ वेळा निवडून आलेल्या मंत्री सामंतांनी राजापूरला खासदार राऊत यांच्या उपस्थितीत विधान केले. ४५ वर्षे वयोगटावरील जबाबदारी राज्याची नाही तर केंद्राची, यावर मी सुमारे १५ तासांनंतर टीका केली. परंतु त्यावर लगेच सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. परंतु त्या १८ तासांत त्यांनी खुलासा केला नाही. मी सन्मान राखून बोललो होतो, वैयक्तिक टीका केली नव्हती. मी असे बोललोच नाही, असा त्यांनी कांगावा केला. खोटं बोल, रेटून बोल, या त्यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो.
बाळ माने पुढे म्हणाले की, तीन वेळा हरलो म्हणून त्यांनी माझ्यावर टिका केली. पण सामंत जर चार वेळा निवडून आले आहेत तर जिल्हा रुग्णालय अद्ययावत का नाही? २०१३ पासून महिला रुग्णालयाचे काम अपूर्णच आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र सक्षम नाहीत. या व्यवस्था सुधारणे १६ वर्षांत सामंतांना का जमले नाही?
जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी नाही. जिल्हा रुग्णालय सुपर स्पेशालिटी व्हायला हवे होते. याला जबाबदार कोण? ऑक्सिजन प्लँट गेले वर्षभर बांधत आहेत. पायाभूत सुविधा नाहीत, हे अपयश कोणाचे? ६४ कोटींची पाणीयोजना मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मंजूर करून आणली. पैसे येऊनही आजही योजना अपुरी आहे. क्रीडा संकुल पूर्ण करता आले नाही, शिवाजी स्टेडियमच्या सुधारणा नाहीत, खंडाळ्यात क्रीडांगण अपूर्ण आहे. असे कितीतरी विषय आहेत. गणपतीपुळ्याच्या पर्यटनासाठी फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ९० कोटी रुपये दिले. परंतु सामंत यांना रस्ते बांधण्यात जास्त इंटरेस्ट आहे, असा टोला माने यांनी हाणला.
मिर्या बंधार्याला भाजपच्या कालावधीत प्रशासकीय मान्यता मिळाली. या सार्याचे प्रेझेंटेशन करायचे व मी केले असे सांगायचे, ही सामंतांना सवय आहे. पण अपूर्ण आहे, त्याला जबाबदार कोण? आम्ही विरोधी पक्ष म्हणून बोलायचे नाही का? २००४ ला सामंत कसे निवडून आले ते राजन साळवी व शेरे यांना माहिती. . २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म घेतला पण भाजप-सेना युती तुटली म्हणून यांनी शिवसेनेत उडी मारली. ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडेसारख्या या गोष्टी आहेत. बाळ माने हरले त्याना किंमत नाही मग २०१९मध्ये लोकसभा व विधानसभेला मला घेऊन प्रचाराला का नाचले? त्या वेळी मी का चाललो व आज चालत नाही. सोयीनुसार, वेळेनुसार बोलणे हे सामंतांची सवय आहे, अशी टीका माने यांनी केली.
नियोजनबद्ध लसीकरण करण्यासाठी मी एक महिन्यापूर्वी पत्र दिले आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन चांगले काम करीत आहे पण त्यांच्याकडून चांगले काम करून घेणारा पाहिजे घोडेस्वाराची घोड्यावर कमांड नाही. जबाबदार मंत्री म्हणून सकाळी हेलिकॉप्टरने यायचे आणि संध्याकाळी निघून जायचे कोण विरोधात बोलला तर त्याच्यावर टीका करायची मग बगलबच्चेही टिका करू लागतात. हे शिवसैनिक कधी झाले? १९९० पासून माझे व शिवसैनिक रक्ताचे, जवळचे नाते आहे. २०१४ मध्ये आयत्या बिळावर नागोबा झालेल्यांमुळे खरा शिवसैनिक नाराज आहे. हे सामंतसैनिक आहेत, यांनी रत्नागिरीची वाट लावली आहे, असे ठाम मत माने यांनी व्यक्त केले.
विरोधक बोलला की त्याच्यावर चारी बाजूंनी हल्ला करायचा. पण आम्ही रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलो, दोन पिढ्या संघ, भाजपाशी एकनिष्ठ आहोत. मी आमदार होईन, असे वाटलेही नव्हते. २००४, २००९ व २०१४ मध्ये मी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे लॉबींग केले नाही. सामंत यांच्यावर मी वैयक्तिक टिका केली नाही. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. आता त्यांना पालकमंत्रीपद रत्नागिरीचे न मिळता सिंधुदुर्गचे का मिळाले? अशी टीका आम्ही केली नाही.
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी निवडणूक युती म्हणून निवडली. तेव्हा सामंत ९० हजार मतांनी जिंकले. पण राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवारालाही ३५ हजार मते मिळाली. भाजपची सुमारे ६५ ते ७० हजार मते सामंतांना मिळाली म्हणजे नक्की किती मतांनी सामंत जिंकले याचा विचार करावा, असा सूचक इशाराही माने यांनी दिला.
समस्येच्या मुळात गेले पाहिजे, परंतु बगलबच्चे हल्ला करून मूळ विषयाला बगल देतात. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हील सर्जन का गेले? आरोग्य व्यवस्थेत राज्यकर्त्यांना अनेक बदल करता येण्यासारखे आहेत. परंतु कोणी बोलला तर त्याची हुयार्र्े उडवायची, बाजूला करायचे, हेच चालू आहे.
सामंत हे २००४ पासून आमदार, मंत्री, पालकमंत्री आहेत. त्यांनी २००४पासून केलेल्या घोषणांचा एक ग्रंथ काढता येईल, अशी खिल्ली बाळ माने यांनी उडवली. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला ते पंढरपूरला कशाला गेले होते? मी सांगत होतो, तुम्ही इथे थांबा, मंत्र्यांना भरपूर अधिकार आहेत, तुम्ही हॉस्पीटलमध्ये बघा. किल्लारीला भूकंप झाले तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार स्वतः ठाण मांडून बसले होते.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण सांगता माने म्हणाले, रत्नागिरीत अमली पदार्थ विक्रीला राजाश्रय कोणी दिला. हिस्ट्रीशिटर, सेक्स स्कँडल अशी प्रकरणे चालू आहेत. या लोकांना, उद्यमनगर, कोकणनगरमध्ये कोणी पाठबळ दिले. सामंत निवडून आल्यापासून अशाना आश्रय मिळतोय. ज्या भारती शिपयार्डमधील कामगारांनी २००४ ला सामंतांना ५ हजार लोकांनी निवडून दिले, ती कंपनी आज ८ वर्षे बंद असून त्यांच्या घरी चूल पेटत नाही. ही कंपनी कोणी चालू करायची? अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये गुन्हेगारीकरण चालू आहे.
लसीकरणाची बेबंदशाही सुरू आहे. पण आम्ही राजकारण नव्हे समाजकारण करतो. नाहीतर टोप्या बदलल्या असत्या, असे माने यांनी ठामपणे सांगितले. लसीकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय का, या प्रश्नाला उत्तर देताना माने म्हणाले, ही सगळी वार्यावरची वरात झाली आहे. या कार्यकर्त्यांनाही मी सांगितले आहे, हस्तक्षेप करू नका. पण माझा राजकीय स्वभाव नाही. सध्या सामंतांच्या विरोधात कोणीही बोलत नाही. मी म्हणेन ते धोरण आणि मीबांधेन तेच तोरण हीच सामंत यांची भूमिका आहे मागील पालकमंत्री वायकर आणि आत्ताचे पालकमंत्री परब यांना हे कामच करु देत नाहीत.
पण जनतेला वार्यावर सोडले आहे कोरोनाकाळात जनतेला मदत हवी आहे. राजकारण नकोय. आम्ही मदतीला तयार आहोत. असे माने यांनी सांगितले
www.konkantoday.com