
माळवाशी येथे कार अपघातात सासू, सुनेचा मृत्यू
देवरूख : भरधाव वेगात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार उलटून झालेल्या अपघातात सासू, सुनेचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास देवरुख – रत्नागिरी मार्गावर माळवाशी येथे घडला. दीपिका दीपक सावंत ( वय ५०) आणि भागिरथी दगडू सावंत (वय ८५, रा . माळवाशी मावळतवाडी ) अशी या अपघातात मृत महिलांची नावे आहेत. वाशी तर्फे देवरूख येथे शुक्रवारी ग्रामदेवता मंदिरात कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय मुंबईतील वाशी येथून आपल्या घरी येत होते. स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०२ सीआर ५२४१ ) शुभम दीपक सावंत चालवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची गाडी पाटगाव घाटीच्या पुढे हॉटेल हिल पॉईंट येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. गाडी वेगात असल्याने यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या. कारमधून चारजण प्रवास करत होते. प्रथमेश प्रकाश हळदणकर हा जखमी झाला आहे. या अपघातामुळे वाडीवर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त कळताच देवरूख पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या अपघात प्रकरणी प्रथमेश हळदणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.