
राज्य संगीत नाट्यची अंतिम फेरी रत्नागिरीत
राज्यातील नामांकित संस्थांच्या 16 नाट्यप्रयोगांना 10 पासून प्रारंभ
रत्नागिरी : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणारी 60 वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत 10 मार्चपासून सुरू होणार आहे. गोवा, सोलापूर, मुंबई, पुणेसह विविध संस्थांचे 16 नाट्यप्रयोग याठिकाणी सादर होणार आहेत. या स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.
10 मार्च रोजी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक संस्था, रत्नागिरीचे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 11 मार्च रोजी मुंबईतील अमृत नाट्य भारती आयोजित ‘धाडिला राम तिने का वनी’; 12 मार्च रोजी दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा यांचे ‘गोपिकारमणु स्वामी माझा’; 13 मार्च रोजी अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर निर्मित ‘संगीत स्वप्नवासवदत्ता’; 14 मार्च रोजी सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’; 16 मार्च रोजी कलारंग नाट्यप्रतिष्ठान, खंडाळा निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’; 17 मार्च रोजी खल्वायन, रत्नागिरी निर्मित ‘ययाति आणि देवयानी’; 18 मार्च रोजी आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी निर्मित ‘देवमाणूस’; 19 मार्च रोजी श्री ओंकार थिएटर्स गोवा निर्मित ‘कट्यार काळजात घुसली’; 20 मार्च रोजी मुंबईतील परस्पर सहाय्यक मंडळ निर्मित ‘सुवर्णतुला’; 21 मार्च रोजी कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आयोजित ‘संगीत पंढरपूर’; 22 मार्च रोजी संक्रमण, पुणे निर्मित ‘आरंभी स्मरितो पाय तुझे’; 23 मार्च रोजी सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा निर्मित ‘विठू आलो माहेरा’; 24 मार्च रोजी मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, मोरजी, पेडणे, गोवा निर्मित ‘शिक्का कट्यार’; 25 मार्च रोजी श्रुती मंदिर, सोलापूर निर्मित ‘सूर-साज’ आणि 27 मार्च रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, आयोजित ‘तुका म्हणे आता’ ही संगीत नाटके सादर होणार आहेत.