
नोंदीत बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तू पैसे मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : नोंदीत बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तू, अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच मोफत दिला जात आहे. हे वस्तू संचासाठी कोणीही पैसे मागत असेल तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधिताना दिल्या. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यावतीने चिपळूण तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चिपळूण येथे झाला. यावेळी आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सहाय्यक आयुक्त कामगार संदेश आयरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसिलदार प्रविण लोकरे, परिविक्षाधीन सहाय्यक कामगार आयुक्त निशिगंधा रसाळ आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, नोंदीत बांधकाम कामगारांना १९ हजार किंमतीचे वस्तू संच मोफत दिले जात आहे. परंतु, काही ठिकाणी यासाठी पैसे मागण्यात येत असून, भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारे पैसे मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा. कामगार विभागामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. शासनाकडून माझी लाडकी बहीण, लेक लाडकी, शुभमंगल, तीर्थ दर्शन अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेतल्यास आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले. नोंदीत कामगारांसाठी कामगार विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नियमित लाभ घेण्यासाठी दरवर्षी नोंदणी करणे गरजेचं आहे. नोंदणी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. येथे आलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या शेजारील कामगारांची कमीत कमी एक नोंदणी करावी आणि या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवावा, असे आवाहनही त्यानी यावेळी केले. राकेश सुरेश दाते, मिनाक्षी मोहन कांबळे, सोनम सुविध सावंत, राजश्री राजेश जाधव, अस्मिता राजेंद्र कदम यांना यावेळी गृहोपयोगी वस्तू व सुरक्षा संचचे प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नोंदीत बांधकाम कामगार अरविंद अनंत पिंपळकर यांना मुलींच्या विवाहासाठी ५१ हजारांचा धनादेश, नोंदीत बांधकाम कामगार प्रमोद गंगाराम काजरे यांना त्यांच्या विवाहासाठी ३० हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आयरे यांनी केले.००००