
आपली एक छोटीशी खरेदी या मुलांसाठी प्रेरणा ठरू शकते
दिवाळीचा सण म्हटले की उत्साह आनंदाचा मंगलमय सण असतो. आपला हा सण आनंदाने साजरा करण्याकरिता आविष्कार मतीमंद शाळेची मुलंदेखील सरसावली आहेत. जन्माला आल्यानंतर आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून त्यावर मात करण्याचा या मुलांच्या प्रयत्नांना त्यांचे मार्गदर्शक मोलाची साथ देत आहेत. या मुलांनी आपल्या हस्तकौशल्याने कंदिलापासून मेणबत्तीपर्यंत अशा सुंदर परंतु सुबक वस्तू बनविल्या असून त्याचे प्रदर्शन व विक्री वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे तळमजल्यावर सुरू आहे. उद्यापर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेले मोठे कंदिल, छोटे कंदिल सर्वांना आकर्षित करून घेत आहेत. याशिवाय एकत्रित पॅकेजमध्ये कंदिलापासून पणत्या, उटणे ठेवण्यात आले आहे. मेणबत्त्यांपासून छोट्या आकर्षक पर्सेस एवढेच नव्हे तर घराघरात लागणारे फिनेलपासून स्टेशनरीपर्यंत या विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने आपल्या मार्गदर्शकांच्या साथीने वस्तू बनविल्या आहेत. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः हे विद्यार्थी विक्री करण्याकरिता उभे राहिले आहेत. आपण बनविलेली एखादी वस्तू समोरचा ग्राहक खरेदी करीत आहे. हे पाहताना त्यांच्या चेहर्यावरचा आनंदच बोलून जातो. एरवी आपण सहजगत्या चारपाचशे रुपये खर्च करून टाकतो. परंतु या ठिकाणी नाममात्र किंमतीत असणार्या या वस्तूंची आपण रत्नागिरीकरांनी खरेदी केली तर आपण खरेदीचा आनंद तर घेऊ शकतो शिवाय या मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना एकप्रकारे स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आपण मदतीचा हातही देत असतो. यामुळे रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी व या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे.
www.konkantoday.com