जिल्ह्यातील नॉन कोव्हिड रुग्णालयाना तातडीने ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करावा -रत्नागिरी शहर काँग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण
कोरोनाने आरोग्य क्षेत्रात आणीबाणीची स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना उपाचाराबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा प्राधान्याने करायलाच हवा. मात्र या कारणास्तव जिल्ह्यातील नॉन कोव्हिड खासगी रुग्णालयांना होणारा ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त अन्य गंभीर आजारी रुग्णांचे जीवित धोक्यात आले आहे. ही गंभीर समस्या तातडीने सोडविण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा नॉन कोव्हिड रुग्णालयांना पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे.
राकेश चव्हाण यांनी मंत्री थोरात आणि मंत्री सामंत यांना पाठविलेल्या निवेदनवजा पत्रात म्हटले आहे की, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना प्राणवायूची अत्यंत आवश्यकता असते. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रुग्णांनाही प्राधान्याने ऑक्सिजन पुरवठा करून वाचविणे ही शासनाची आणि रुग्णालयांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या १० दिवसांपासून येथील सर्व नॉन कोव्हिड खासगी रुग्णालयाना होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर रत्नागिरी एम.आय.डी.सी. मधील ऑक्सिजन पुरवठादार यांनी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अपघातातील गंभीर जखमी तसेच प्रसूती शस्त्रक्रियेच्या वेळी आवश्यक रुग्णांना अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन त्या रुग्णांना मिळू शकत नसल्याने अशा रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत.
या स्थितीत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून येथील सर्व खासगी रुग्णालयाना ऑक्सिजन पुरवठा बंद आहे. त्यामुळे अपघातातील गंभीर रुग्ण, प्रसूती रुग्ण, गंभीर आजारी छोटी मुले यांची ऑक्सिजन अभावी फरपट सुरू आहे. कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन देणे यात काहीच चुकीचे नाही. परंतु नॉन कोव्हिड रुग्णालयातील गंभीर रुग्णांना अत्यावश्यक बाब म्हणून तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आपण आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंतीवजा मागणी रत्नागिरी काँग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर, रत्नागिरी काँग्रेसचे प्रभारी मनोज शिंदे यांना पाठविलेल्या आहेत.
www.konkantoday.com