
आर्ट सर्कल कडून दोन हिंदी नाटकं स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आर्ट सर्कल कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
पण रसिकहो, या शुभेच्छा कोरड्या किंवा फक्त शाब्दिक नाहीत. गेले 17 वर्ष या शुभेच्छा शास्त्रीय संगीत महोत्सवाच्या रूपाने देत आलो. या शुभेच्छांमध्ये यंदा भर पडली आहे.

दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी 2025 या दोन दिवसांमध्ये मोटली प्रोडक्शन निर्मित दोन हिंदी नाटकं स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहेत.
3 फेब्रुवारी रोजी नसीरुद्दीन शहा आणि रत्ना पाठक अभिनित एक दस्तान एक हकीकत सादर होईल. अत्यंत सशक्त दोन कलाकार रंगमंचावर आले की अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी कशी होते याचही या निमित्ताने दर्शन होणार आहे. अशोक लाल लिखित या द्विपात्री नाटकाचं दिग्दर्शनही नसीरुद्दीन शहा यांनी केलं आहे. कलावंत ओळखीच्या पलीकडे पोहोचलेला असतो तो कसा हे नसीरुद्दीन आणि रत्ना शहा यांच्याकडे बघून कळतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या तालमीतून तावून सुलाखून बाहेर पडलेले हे दोन लखलखते कलाकार! उत्तमाचा ध्यास घेऊन आयुष्यभर काम करत मोटली प्रॉडक्शनच्या छताखाली एकाहून एक दर्जेदार नाटकांची निर्मिती या जोडप्याने केली आहे.

*दुसऱ्या दिवशी दिनांक 4 फेब्रुवारीला औरत औरत औरत नाटक* होणार आहे. सीमा पाहवा, भावना पानी, त्रिशला पटेल, श्रुती व्यास, प्रेरणा चावला, जया विराली अशा तगड्या अभिनेत्री या नाटकाच्या मुख्य भूमिकेत आहेत.ज्येष्ठ अभिनेत्री *सीमा पाहावा* यांची कारकीर्द दूरदर्शनच्या हम लोग पासून सुरू झाली. हिप हिप हुर्ये, अस्तित्व एक प्रेम कहानी , संजीवनी आ मेडिकल बून झी वरील कसम से अशा डेली सोप मालिका, आँखो देखी, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान अशा फिल्म्स, अधुरी जिंदगी, गंगू बाई काठीयावाडी या सारख्या फिल्म्स मधून त्यांनी दमदार अभिनय केला आहे. राम प्रसाद की तेहरवी या फिल्मच्या दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.
*भावना पाणि* या हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आदी भारतीय भाषांमध्ये चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री आहेत. ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण गुरू केलुचरण महापात्रा आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण गुरू पंडित बिरजू महाराज यांच्याकडून त्यांनी घेतले आहे. तेरे लिये, दिल विल प्यार व्यार आदी हिंदी फिल्मसमधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच या नाटकात अत्यंत गुणी दिग्दर्शिका लेखिका आणि हिंदी इंग्लिश बाल रंगभूमीवर काम करणारी *त्रिशला पटेल* ही देखील मुख्य भूमिकेत आहे. पंडित सत्यदेव दुबे, मकरंद देशपांडे, नसीरुद्दीन शहा यांच्याकडून मार्गदर्शन मिळवत तिने आपली कारकीर्द हिंदी गुजराथी रंगभूमीवर बहरवली आहे. तान्हाजी द अनंसग वॉरियर्, बंटी और बबली, चेहरा अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय करतानाच बाल रंगभूमीवर देखील अतिशय कल्पक आणि दर्जेदार नाट्यलेखन, दिग्दर्शन ती करत आहे.
*श्रुती व्यास* या अतिशय अभ्यासू धाडसी पत्रकार, ताकदीची अभिनेत्री, आणि संवेदनशील लेखिकेची या नाटकात मोलाची भूमिका आहे. उत्तम अभिनेत्री आणि डबिंग कलाकार असलेली *प्रेरणा चावला*, तसेच *जया विराली* यांनी आपल्या भूमिकांनी औरत औरत औरत या नाटकाला चार चांद लावले आहेत.
या दोन आणि महोत्सवाच्या तीन अशा पाचही तारखा आपल्या डायरी मध्ये अवश्य नोंदवून ठेवा जेणेकरून संगीत महोत्सव आणि खूप वर्षांनी होणारे हिंदी नाटकांचे प्रयोग सभासद, तसेच तिकीट काढून येणारे रसिक यांना चुकणार नाहीत.आर्ट सर्कलच्या वार्षिक सभासद किंवा वरील नाटकांच्या प्रवेशिका या संदर्भात आर्ट सर्कलशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.