आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. आपणही त्यातील खारीचा वाटा उचलूया


आरोग्य विभागाने चिपळूण मधील स्थानिक प्राथमिक शिक्षिकाना चिपळूण तालुका कंट्रोल रूमची नेमणूक दिली. मी स्वतः सौ मंजुषा पाध्ये व माझ्या सारख्या अनेक सख्या ज्यांनी वयाची 50 पूर्ण केली आहेत अशानाही नेमणूक आदेश मिळाले. मनामध्ये भीतीचे ढग जमा झाले.आपण ही नेमणूक नाकारायची या आवेशाने आम्ही आज सकाळी 10।30 ला पंचायत समिती चिपळूण तेथे हजर झालो.
प्रथम सत्रात तालुक्याचे कंट्रोल अधिकारी श्री. स्वप्नील चव्हाण सर यांनी आमचे आपल्या गोड शब्दांनी स्वागत केले व आपल्या ओघवत्या भाषाशैलीचा पुरेपूर वापर करून आम्हीच या कामासाठी कसे योग्य आहोत हे पटवून दिले ,नव्हे तर मत परिवर्तन केले. हेच म्हणणे योग्य ठरेल. यानंतर कितीही कामाचा बोजा वाहिला तरी सदैव हसतमुख ,पॉझिटिव्ह विचारधारा सोबत घेऊन फिरणाऱ्या सर्वांच्या लाडक्या डॉ ज्योती यादव यांनी कामाचे स्वरूप समजावून दिले.सोबत आमच्या प्रमुख, शिक्षण विभागातील प्रभावी व्यक्तिमत्व ,सुख दुःखाच्या साथीदार शिक्षण विस्तार अधिकारी सौ शशाली मोहिते मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले आहेत या कोरोना काळात. त्या आपल्या पाठीशी खंबीर असताना आपण का घाबरावे म्हणून आम्ही सर्व सख्या कोणतीही तक्रार न करता कामाला सज्ज झालो.
आज दुपारी 2 ते रात्री 8 मी व माझी मैत्रीण पूजा धुरी आमची ड्युटी सुरू झाली. सुरवात झाली तीच मुळी दोन तरुण भावंडांच्या आगमनाने, ती मुलगी आली व म्हणाली आम्ही दोघे पॉझिटिव्ह आहोत व घरीच विलग राहणार आहोत.आम्ही म्हणजे मी व सकाळ सत्रातील सौ शीतल राजे व सौ चांदणे बाई मनातून खूप घाबरलो. हे दोघे इथे का आले? असा प्रश्न आम्हालाही पडला. पण स्वतःला सावरत आमच्यातील कंट्रोलर जागा झाला. मी स्वतः त्यांची प्रेमाने विचारपूस करून माहिती घेतली व वरिष्ठांना कळविली व योग्य मार्गदर्शन करून त्या दोघांना घरी पाठविले.
गप्पा ,अनुभव कथन यामध्ये आमचा वेळ घालवत असताना अचानक पावणे पाच वाजता एक फोन आला . मी अमुक अमुक (गुप्तता पाळावयाची असल्याने नाव लिहीत नाही) मला ताप आला आहे ,खोकला पण आहे ,घसा दुखतोय,श्वास घ्यायला त्रास होतोय तर मला दवाखान्यात ऍडमिट व्हायचे आहे .त्यासाठी गाडी मिळेल का? मी त्या व्यक्तीचे नाव , फोन नंबर , पत्ता ,वय सर्व माहिती घेतली व माझ्या वरिष्ठांजवळ बोलून 10 मिनिटांनी फोन करते असे सांगितले. त्वरित आमचे प्रमुख श्री स्वप्नील चव्हाण सर यांना फोन करून वरील सर्व माहिती दिली.
त्यानी मला रुग्णाने 108 नंबरला फोन केला होता का ?असे विचारले. अरे बापरे! मी हा प्रश्न विचारलाच नाही म्हणून त्या रुग्णाला पुन्हा फोन केला. माझा हा प्रश्न ऐकताच तो रुग्ण खूप चिडला व म्हणाला ,”कशाला फोन करायचा
? त्या गाडीचा ड्रायव्हर म्हणतो ,”एकही बेड शिल्लक नाही . तुम्हाला गाडीतून नेऊन काय करू? रात्रभर काय गाडीतच बसणार आहात?”असे अजून बरेच काही………. तो बोलला. शेवटी म्हणाला ,”मला तुम्ही दवाखान्यात जाण्यासाठी गाडी देणार की नाही ते सांगा माझी अवस्था खूप वाईट आहे असे अजून बरेच काही ……..” शेवटी मी त्याना म्हटले ,”हे पहा मला फक्त 10 मिनिट द्या मी माझ्या वरिष्ठांजवळ बोलते व पुनः फोन करते.”त्यावर ते म्हणाले,” नक्की फोन कराल ना की …….. “मी म्हटले माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच आहोत.मला फक्त 10 मिनिटे द्या.आणि हो तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था नक्की करणार !फक्त मला 10 मिनिट द्या. मी तुम्हाला पुन्हा फोन करते.
या नंतर मी आमच्या तालुका प्रमुख डॉ ज्योती यादव यांना फोन करून सर्व माहिती दिली. व आता मी त्यांना काय सांगू? असे विचारले. डॉक्टर त्वरित म्हणाल्या,”त्यांना सांगा आपण त्यांच्यासाठी गाडी पाठवत आहोत.”हे ऐकताच मला खूप आनंद झाला.कारण एक रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोचणार होता. तोही माझ्या एका फोन मुळे. मित्रानो तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तरुण मुलगा डोळ्यासमोर जाताना पाहिलेल्या या आईचे डोळे पाण्याने डबडबले होते.
त्याच क्षणी मी त्या रुग्णाला फोन करून सांगितले,” सर काळजी करू नका ,तुम्हाला न्यायला गाडी येत आहे “
मित्रांनो खरी मजा तर आता आहे मी हे सांगितल्यावर फोन वरील व्यक्ती म्हणाली,” मॅडम,मी डॉक्टर सानप बोलतोय!(डॉ सानप म्हणजे कामथे रुग्णालयाचे प्रमुख शल्यचिकित्सक) मी दिलेला नंबर खरा आहे पण रुग्ण खोटा आहे. आम्ही हे पहात होतो की ज्या उद्देशाने आम्ही हा कक्ष उभारला आहे त्याचा हेतू साध्य होतोय की नाही हे पाहण्यासाठी हा फोन आम्ही केला होता. मला आनंद होत आहे की तुम्ही आपली ड्युटी 100% निभावली आहे.
मित्रांनो प्रसंगातील खरे खोटेपणा बाजूला ठेवूया पण आजच्या घडीला हे सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. आपणही त्यातील खारीचा वाटा उचलूया व ही नाव सुखरूप पैलतीरी पोचवूया असे माझे प्रामाणिक मत. आम्हाला या कामासाठी योग्य समजणाऱ्या सर्व वरिष्ठांना मनापासून धन्यवाद !!!
तसेच स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व कोविड योध्याना माझा मनाचा मुजरा !!!!!
सौ. मंजुषा पाध्ये
प्राथमिक शिक्षिका
शाळा पाग कन्या,चिपळूण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button