शेतकऱ्यांनी काजू बी प्रती किलो १५० रूपयांपेक्षा कमी दराने विक्री करू नये :बाळासाहेब माने
रत्नागिरी – काजू बी ला प्रतिकीलो १५० रुपये हमीभाव हा मिळालाच पाहिजे, त्यासाठी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यानी आपली काजू बी १५०रुपयांच्या खाली विकू नये, असं आवाहन रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केलं आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी बाळासाहेब माने म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काजू लागवड केलेली आहे. मात्र इथल्या बाजारपेठेचा गैरफायदा घेऊन तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावाचं भांडवल करून, काही खरेदीदार किंवा काजू प्रोसेसिंग कंपन्यांचे काही प्रतिनिधी काजू बीला भाव देत नाहीत, ५० ते ६० रुपये किलोने काजू बी खरेदी करण्याचं षडयंत्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मात्र काजू बीला किमान १५०रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, एवढा भाव मिळाला तरच कोकणातील काजू उत्पादक शेतकरी वाचणार आहे.
लहरी हवामानामुळे यावर्षी काजूचं उत्पादनही कमी झालेलं आहे, उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांनी काजू बी ही हमीभाव योजनेमध्ये समाविष्ट केली पाहिजे. दलाल गब्बर होत आहेत, मात्र शेतकरी राजा उपाशी राहतोय. त्यामुळेच कोणत्याही शेतकऱ्याने आपली काजू बी १५० रुपयांच्या खाली विकू नये, असं आवाहन रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तसेच माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केल आहे.
www.konkantoday.com