
श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज् ट्रस्टच्या वतीने सलग सातव्या वर्षी ‘डेरवण युथ गेम्स’ स्पर्धांचे आयोजन
खेड : श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज् ट्रस्टच्या वतीने सलग सातव्या वर्षी ‘डेरवण युथ गेम्स’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ता. २४ मार्च ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शिवजयंतीनिमित्त रंगणार्या डेरवण युथ गेम्ससाठी सर्वच खेळाडू आता कसून सरावाला लागले आहेत.
चिपळूणजवळील डेरवणमधील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज् ट्रस्ट – एसव्हीजेसीटीच्या भव्य क्रीडासंकुलात १८ खेळांच्या अटीतटीच्या लढतींसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुध्दीबळ, कॅरम, तसेच देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरीता लंगडी, खो खो, कबड्डी, मल्लखांब या खेळांसह बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. ऑलिम्पिक मध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आलेला वॉल क्लाईम्बिंग या प्रकारातही साहसी खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणार्या या स्पर्धेत राज्यभरातील पाच हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, चषक तसेच एकूण १२ लाखांहून अधिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. ९०० पदके, ५० करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षिस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ कोकणवासियांना या स्पर्धेनिमित्त पहाण्याची पर्वणी मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ता. २४ मार्च रोजी जल्लोषपूर्ण समारंभाने होईल. समारोप शिवजयंतीच्या दिवशी ता. ३१ मार्चला करण्यात येईल. स्पर्धेच्या काळात क्रीडाक्षेत्रातील रोजगाराच्या संधी, डोपिंग शाप की वरदान तसेच ऑलिम्पिक विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी क्रीडा मानसतज्ञ, आहार तज्ञ तसेच प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडूंचा परिसंवाद व मुलाखतीचा कार्यक्रमही रंगणार आहे.
स्पर्धेत 0८ वर्ष ते १८ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होणार आहेत. २२ मार्च पर्यंत प्रवेश नोंदणी सुरू रहाणार असून ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacademy.com सुरू झाली आहे. स्पर्धेच्या नोंदणीकरीता ९८२२६३९३०६, ९३२५८९७८७७, ९८२२००१६९२, ९२२५६५०२६४ या मोबाईलवर संपर्क साधावा.
www.konkantoday.com